>> तिसर्या सामन्यात जोस बटलरचे नाबाद शतक
जोस बटलर याच्या झंझावाती शतकावर आरुढ होत इंग्लंडने काल तिसर्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा १६ धावांनी पराभव केला. या विजयासह पाहुण्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. यजमानांनी नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर इंग्लंडने ३०३ धावा फलकावर लगावल्या.
स्टीव स्मिथ (४५) व मिचेल मार्श (५५) यांच्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ अवलंबून होता. परंतु, महत्त्वाच्या टप्प्यावर हे दोघे बाद झाल्याने सामना कांगारूंच्या हातातून निसटला. बटलर याने मार्क वूड (४६-२) याच्या गोलंदाजीवर स्मिथचा जमिनीलगत सुरेख झेल घेत इंग्लंडच्या विजयातील प्रमुख अडसर दूर केला. मार्कुस स्टोईनिस याने तळाला ५६ धावा चोपून विजयासाठी प्रयत्न केले. परंतु, डावाच्या सुरुवातीला प्रमुख गोलंदाज लियाम प्लंकेट याला पायाच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागूनही एका गोलंदाजाच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियाचा पराभवाचा डोस पाजला.
सिडनीतील संथ खेळपट्टीवर केवळ जोस बटलर याला मोठी खेळी करणे शक्य झाले. त्याने हाणामारीच्या षटकांत कांगारूंच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्याने इंग्लंडला तीनशे धावांचा टप्पा ओलांडणे शक्य झाले. इंग्लंडच्या आघाडी फळीतील फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करणे शक्य झाले नाही. इंग्लंडने आपल्या शेवटच्या दोन षटकांत ३८ धावांची लयलूट केली. यातील बटलरने ११ चेंडूंत २८ धावा जमवल्या. आपल्या ८३ चेंडूंच्या खेळीत त्याने ६ चौकार व ४ षटकार ठोकून आपले पाचवे एकदिवसीय शतक डावातील शेवटच्या चेंडूवर साजरे केले. पूर्ण क्षमतेनिशी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या आघाडी फळीला जखडून ठेवल्यामुळे धावा आटलेल्या असताना तळाला ख्रिस वोक्सच्या रुपात बटलरला चांगला साथी लाभला. वोक्सने ३६ चेंडूंत ५३ धावा करत बटलरसह ११.५ षटकांत ११३ धावा जोडल्या. माविकेतील चौथा सामना २६ रोजी खेळविला जाणार आहे.
धावफलक
इंग्लंड ः जेसन रॉय झे. फिंच गो. कमिन्स १९, जॉनी बॅअरस्टोव त्रि. गो. झंपा ३९, आलेक्स हेल्स झे. झंपा गो. स्टोईनिस १, ज्यो रुट त्रि. गो. हेझलवूड २७, ऑईन मॉर्गन झे. पेन गो. हेझलवूड ४१, जोस बटलर नाबाद १००, मोईन अली त्रि. गो. मार्श ६, ख्रिस वोक्स नाबाद ५३, अवांतर १६, एकूण ५० षटकांत ६ बाद ३०२
गोलंदाजी ः मिचेल स्टार्क १०-०-६३-०, जोश हेझलवूड १०-०-५८-२, पॅट कमिन्स १०-१-६७-१, मार्कुस स्टोईनिस ८-०-४३-१, ऍडम झंपा ९-०-५५-१, मिचेल मार्श ३-०-१४-१
ऑस्ट्रेलिया ः ऍरोन फिंच पायचीत गो. रशीद ६२, डेव्हिड वॉर्नर झे. हेल्स गो. वोक्स ८, कॅमरून व्हाईट झे. बटलर गो. वूड १७, स्टीव स्मिथ झे. बटलर गो. वूड ४५, मिचेल मार्श झे. हेल्स गो. रशीद ५५, मार्कुस स्टोईनिस झे. बिलिंग्स गो. वोक्स ५६, टिम पेन नाबाद ३१, पॅट कमिन्स नाबाद १, अवांतर ११, एकूण ५० षटकांत ६ बाद २८६
गोलंदाजी ः मार्क वूड १०-१-४६-२, ख्रिस वोक्स १०-०-५७-२, लियाम प्लंकेट १.२-०-६-०, मोईन अली १०-०-५७-०, ज्यो रुट ८.४-०-६०-०, आदिल रशीद १०-०-५१-२