पणजीतील नागरिक व पणजी गट कॉंग्रेसने काल कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विशेष मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन पणजीतील लोकांना रोज किमान १० तास पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. पणजीतील बहुतेक भागांतील लोकांना दिवसाला दोन तासांच्या वर पाणीपुरवठा होत नाही. तसेच पाण्याचा दाबही खूपच कमी असतो ही बाबही त्यांनी त्यांच्या नजरेस आणून दिली.
यावेळी नागरिकांनी पाण्यासंबंधीची समस्या सविस्तरपणे विशेष मुख्य अभियंत्यांसमोर मांडली. यावेळी गिरीश चोडणकर यांनी त्यांना एक निवेदन सादर केले. तसेच किती दिवसांत हा पाण्याचा प्रश्न धसास लावण्यात येईल ते स्पष्ट करण्याची त्यांच्याकडे मागणी केली.
यावेळी आश्वासन देताना विशेष मुख्य अभियंत्यांनी हा प्रश्न धसास लावण्यासाठी किती काळ लागेल ते आठ दिवसांत सांगण्याचे आश्वासन दिले. येत्या आठ दिवसांत त्याबाबत सविस्तर काय ते कळवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.