कदंब पठारावरील साईबाबा मंदिराजवळील बेकायदा डोंगरकापणी रोखण्यासाठी गेलेल्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकातील फिल्ड सर्व्हेयरला धक्काबुकी आणि शिवीगाळ प्रकरणी भाजपचे सांताक्रुज मतदारसंघातील नेते हेमंत गोलतकर यांच्याविरोधात ओल्ड गोवा पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बेकायदा डोंगर कापणासाठी वापरण्यात आलेले पोकलीन आणि सहा ट्रक ताब्यात घेतले आहेत.
ही घटना रविवारी दुपारी घडली आहे. पणजी ते ओल्ड गोवा महामार्गावरील कदंब पठारावर बेकायदा डोंगरकापणी केली जात आहे, अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर भरारी पथकाने त्वरीत कदंब पठारावर धाव घेतली. भरारी पथकाला डोंगर कापणीचे काम जोरात सुरू असल्याने आढळून आले. भरारी पथकाने संबंधिताकडे आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली. भरारी पथक चौकशी करीत असताना भाजपचे नेते हेमंत गोलकर घटनास्थळी दाखल झाले. गोलतकर यानी सरकारी अधिकार्यांला शिवगाळ करून त्यांच्याशी असभ्य वर्तन करण्यास सुरूवात केली. असा आरोप करण्यात आला आहे.