पाक, अफगाण, विंडीजचा विजय

0
129

आयसीसी अंडर क्रिकेट स्पर्धेला १३ जानेवारीपासून न्यूझीलंडमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या सराव सामन्यांना मात्र काल सोमवारपासून सुरुवात झाली. या सामन्यांत पाकिस्तान, अफगाणिस्तान, न्यूझीलंड व वेस्ट इंडीज यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले.

पहिल्या सराव लढतीत पाकने नामिबियाचा १९० धावांनी दारुण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकने ४०.५ षटकांत सर्वबाद २९७ धावा केल्या. पाककडून मोईन खान याने १०२ धावांची खेळी साकारली. यानंतर त्यांनी नामिबियाचा डाव त्यांनी ३०.३ षटकांत १०७ धावांत संपवला. शाहीन आफ्रिदी व मोहम्मद तल्हा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करत त्यांच्या डावाला खिंडार पाडले.

अफगाणिस्तान व बांगलादेश यांच्यात दुसरा सामना झाला. अफगाणिस्तानने ८ बाद २०६ धावा फलकावर लगावताना बांगलादेशचा डाव केवळ १५० धावांत संपवून ५६ धावांची मोठा विजय प्राप्त केला. अफगाणिस्तानच्या अझमतुल्ला याने केवळ ६६ चेंडूंत ८१ धावा चोपत उपस्थितांचे मनोरंजन केले. नवीन उल हक याने ३८ धावांत ४ फलंदाजांना माघारी पाठवत अफगाणच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
न्यूझीलंड व झिंबाब्वे यांच्यातील सामना देखील एकतर्फीच झाला. कर्णधार कायलम बोशियर याने कुर्मगती फलंदाजी करत ११३ चेंडूंत ६६ धावा जवत न्यूझीलंडवर दबाव टाकला. तळाला टॉड वॉटसन याने ३२ चेंडूंत ५२ धावांची आक्रमक खेळी केल्याने किवीज संघाला २२० धावांपर्यंत जाता आले. कर्णधाराने यानंतर गोलंदाजीत चमक दाखवताना १७ धावांत ३ बळी घेतले.

दुबळ्या पापुआ न्यू गिनीला नमविण्यासाठी विंडीजला अधिक मेहनत घ्यावी लागली नाही. पापुआ न्यू गिनीने विजयासाठी ठेवलेले १०६ धावांचे माफक लक्ष्य विंडीजने २२.३ षटकांत ३ गडी गमावून गाठत विजय साकारला. विंडीजच्या भास्कर याद्रम याने फलंदाजीत चमक दाखवताना २३ चेंडूंत नाबाद ३७ धावा जमवल्या.