
पाचवा कसोटी सामना जिंकून ऍशेस मालिका ४-० अशी खिशात घालण्यासाठी यजमान ऑस्ट्रेलियाला आज इंग्लंडचे केवळ ६ गडी बाद करावे लागणार आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३०३ धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडची चौथ्या दिवशी दुसर्या डावात ४ बाद ९३ अशी दयनीय स्थिती झाली आहे. कर्णधार ज्यो रुट याने बोटाच्या दुखापतीनंतरही नांगर टाकताना ४२ धावा केल्या असून जॉनी बॅअरस्टोव १७ धावा करून त्याला साथ देत आहे.
तत्पूर्वी, शॉन व मिचेल मार्श या बंधूंनी एकाच डावात शतके झळकावून अशी कामगिरी करणारी ऑस्ट्रेलियाची तिसरी जोडी होण्याचा मान मिळविला. ग्रेग चॅपेल व इयान चॅपेल तसेच स्टीव व मार्क वॉ या बंधूंनी ऑस्ट्रेलियाकडून असा कारनामा केला आहे. तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आठव्यांदा असे झाले आहे. मिचेल मार्शने १४१ चेंडूंत १५ चौकार व २ षटकारांसह १०१ धावा केल्या तर शॉनने २९१ चेंडूंचा सामना करत १५६ धावांची मोठी खेळी साकारली. टिम पेन (३८) व पॅट कमिन्स (२४) नाबाद असताना स्टीव स्मिथने कांगारूंचा डाव घोषित केला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने ३४ षटके गोलंदाजी करताना ५६ धावांत १ गडी बाद केला.