
>> टी-२० मालिकेत भारताचे ३-० असे निर्भेळ यश
मुंबईतील वानखेडे मैदानावर काल रविवारी झालेल्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेचा ५ गड्यांनी पराभव करत तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १३५ धावा केल्या होत्या. भारताने पहिला टी-२० सामना ९३ आणि दुसरा सामना ८७ धावांनी जिंकला होता.
गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर उभय संघांच्या फलंदाजांचा कस लागला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित आणि राहुलने केवळ १७ धावांची सलामी दिली. राहुल ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित (२७), श्रेयस अय्यर (३०) आणि पांडे (३२) यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ विजयाजवळ पोहोचला. मात्र लंकेच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. शेवटच्या दोन षटकांत भारताला १५ धावांची आवश्यकता होती. नुवान प्रदीपने १९व्या षटकातील पहिल्या पाच चेंडूंवर केवळ सहा धावा देत रंगत वाढवली. परंतु, सहाव्या चेंडूवर दिनेश कार्तिकने षटकार खेचत भारताला विजयाच्या दारात नेले. शेवटच्या षटकातील दुसर्या चेंडूवर धोनीने चौकार लगावत सामना जिंकून दिला.
तत्पूर्वी, वानखेडेवर नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी घेत श्रीलंकेला फलंदाजीसाठी पाचारण केले. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत उनाडकटने डिकवेला (१) आणि थरंगा ( ११) यांना बाद करत लंकेला जोरदार धक्का दिला. त्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणार्या वॉशिग्टन सुंदरने कुशल परेराला ४ धावांवर बाद करत टी-२०मधील पहिल्या बळीची नोंद केली. १८ धावांवर ३ गडी बाद झाल्याने लंकेचा संघ संकटात सापडला. त्यानंतर समरविक्रमा आणि गुणरत्ने यांनी थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि लंकेला अर्धशतकी वेस ओलांडून दिली. हार्दिक पंंड्याने ही जोडी फोडत समरविक्रमाला २१ धावांवर बाद केले. त्यानंतर गुणरत्ने आणि शनका वगळता इतर फलंदाज चुणूक दाखवू शकले नाही व लंकेचा डाव ७ बाद १३५ धावांवर थांबला. गुणरत्नेने ३६ आणि शनकाने नाबाद २९ धावा केल्या. भारताकडून पंड्या आणि उनाडकटने प्रत्येकी दोन, तर सुंदर, सिराज आणि यादवने प्रत्येकी एक बळी घेतला. ४ षटकांत केवळ १५ धावा मोजून २ गडी बाद केलेला उनाडकट सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
धावफलक
श्रीलंका ः निरोशन डिकवेला झे. सिराज गो. उनाडकट १, उपुल थरंगा झे. पंड्या गो. उनाडकट ११, कुशल परेरा झे. व गो. सुंदर ४, सदीरा समरविक्रमा झे. कार्तिक गो. पंड्या २१, असेला गुणरत्ने झे. कुलदीप गो. पंड्या ३६, दनुष्का गुणथिलका झे. पंड्या गो. कुलदीप ३, थिसारा परेरा झे. शर्मा गो. सिराज ११, दासुन शनका नाबाद २९, अकिला धनंजया नाबाद ११, अवांतर ८, एकूण २० षटकांत ७ बाद १३५
गोलंदाजी ः वॉशिंग्टन सुंदर ४-०-२२-१, जयदेव उनाडकट ४-०-१५-२, मोहम्मद सिराज ४-०-४५-१, हार्दिक पंड्या ४-०-२५-२, कुलदीप यादव ४-०-२६-१
भारत ः रोहित शर्मा झे. कुशल गो. शनका २७, लोकेश राहुल पायचीत गो. चमीर ४, श्रेयस अय्यर धावबाद ३०, मनीष पांडे त्रि. गो. चमीरा ३२, हार्दिक पंड्या झे. डिकवेला गो. शनका ४, दिनेश कार्तिक नाबाद १८, महेंद्रसिंग धोनी नाबाद १६, अवांतर ८, एकूण १९.२ षटकांत ५ बाद १३९
गोलंदाजी ः अकिला धनंजया ४-०-२७-०, दुष्मंथ चमीरा ४-०-२२-२, थिसारा परेरा ३.२-०-२२-०, नुवान प्रदीप ४-०-३६-०, दासुन शनका ४-०-२७-२
वॉशिंग्टन सुंंदर
सर्वांत युवा टी-२० पदार्पणवीर
टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करणारा सर्वांत कमी वयाचा खेळाडू होण्याचा मान अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने काल मिळविला. श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्या सामन्यात पदार्पण करताना त्याने आपल्या ४ षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात १ गडी बाद केला. १८ वर्षे व ८० दिवसांचा असताना त्याने टी-२० पदार्पण केले. यापूर्वी हा रेकॉर्ड ऋषभ पंत याच्या नावावर होता. पंत याने यावर्षाच्या सुरुवातीला टी-२० पदार्पण केले तेव्हा त्याचे वय १९ वर्षे व १२० दिवस होते. भारताकडून कमी वयात टी-२० खेळणार्यांमघ्ये इशांत शर्मा (१९ वर्षे, १५२ दिवस), सुरेश रैना (२० वर्षे, ४ दिवस) व रवींद्र जडेजा (२० वर्षे, ६६ दिवस) यांचादेखील समावेश आहे.