मुंबई सिटी एफसीचा देखणा विजय

0
111
Balwant Singh of Mumbai City FC celebrates the goal with team players during match 28 of the Hero Indian Super League between NorthEast United FC and Mumbai City FC held at the Indira Gandhi Athletic Stadium, Guwahati India on the 20th December 2017 Photo by: Arjun Singh / ISL / SPORTZPICS

मुंबई सिटी एफसीने हीरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) अवे सामन्यात चौथ्या मोसमात पहिला वहिला विजय मिळविला. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध बलवंत सिंगच्या दोन गोलांच्या जोरावर मुंबईने २-० अशी बाजी मारली. येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर बलवंतने दोन्ही सत्रांमध्ये प्रत्येकी एक गोल केला.

बलवंतने आतापर्यंत यंदाच्या लीगमधील एकूण चार गोल नोंदविले आहेत. तो भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोलच्या शर्यतीत आघाडीवर आला. जेजे लालपेखलुआ (चेन्नईन एफसी) आणि सुनील छेत्री (बंगळुरु एफसी) यांचे प्रत्येकी तीन गोल आहेत.
मुंबईने सात सामन्यांत तिसरा विजय मिळविला. आधीचे दोन विजय त्यांनी घरच्या मैदानावर मिळविले होते. मुंबईचे एकूण दहा गुण झाले. एफसी पुणे सिटीला मागे टाकून मुंबईने गुणतक्त्यात चौथे स्थान गाठले. पुण्याचे सहा सामन्यांत नऊ गुण आहेत. नॉर्थईस्ट सहा सामन्यांतून चार गुणांसह नवव्या स्थानावर कायम राहिले.
नॉर्थईस्टने सरस प्रयत्न केले, पण त्यांना फिनिशिंग करता आले नाही. दुसरीकडे मुंबईने मुंबईने संधीचा फायदा उठविला. यात पूर्वार्धात काही वेळा संधी दवडल्यानंतर बलवंतने संघाची निराशा केली नाही.

३४व्या मिनिटाला अचीले एमाना याने बलवंतला सुंदर पास दिला. बलवंत घोडदौड करीत असतानाच नॉर्थईस्टचा गोलरक्षक रवी कुमार त्याची जागा सोडून पुढे धावत आला. वास्तवित त्यावेळी त्याचे सहकारी बलवंतला रोखू शकत होते, पण रवी पुढे आला त्याने घसरत बलवंतला रोखण्याचा प्रयत्न केला. बलवंतने संधी साधत चेंडू मारला. हा चेंडू रवीच्या पायांमधून नेटमध्ये गेला. टी. पी. रेहेनेश निलंबीत असल्यामुळे या सामन्यात रवीला संधी मिळाली होती.

मुंबईने मध्यंतरास एका गोलची आघाडी टिकविली. दुसर्‍या सत्रात सुरवात वेगवान झाली. ४८व्या मिनिटाला नर्झारी आणि गेर्सन व्हिएरा यांच्यात चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी चुरस झाली. त्यावेळी व्हिएराने नर्झारीला किक मारण्याचा प्रयत्न केला. ५०व्या मिनिटाला नर्झारीच्या क्रॉसपासवर डॅनिलो लोपेसने प्रयत्न केले, पण चेंडू नेटच्या बाहेरील बाजूला लागला.

६८व्या मिनिटाला रोलीन बोर्जेसने दडपणाखाली चेंडू गमावला. त्यामुळे अचीले एमाना याला संधी मिळाली. त्याने चेंडूवर ताबा मिळवित घोडदौड केली आणि बलवंतला पास दिला. बलवंतने संधीचे सोने करीत वैयक्तिक तसेच संघाचा दुसरा गोल केला.