
>> रोहित शर्माचे तिसरे द्विशतक; श्रेयस अय्यर, शिखर धवनची अर्धशतके
भारत आणि श्रीलंका संघात मोहाली येथे झालेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने १४१ धावांनी विजय मिळवला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या द्विशतकी कामगिरीवर कळस चढवत गोलंदाजांनी लंकेच्या फलंदाजांना लोटांगण घालण्यास भाग पाडले. भारताने विजयासाठी दिलेल्या ३९३ धावांचा पाठलाग करताना लंकेचा संघ ८ बाद २५१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने एकाकी झुंज देत नाबाद १११ धावांची शतकी खेळी केली. भारताने या विजयासह पहिल्या सामन्यातील दारुण पराभवाचे उट्टे काढतानाच तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
विजयासाठी ३९३ धावांचे मोठे आव्हान असताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. हार्दिक पंड्याने थरंगाला ७ धावांवर बाद करत लंकेला पहिला धक्का बसला. बुमराहच्या चेंडू लेगसाईडला तटविण्याच्या नादात गुणथिलका धोनीकडे झेल देऊन माघारी परतला. लाहिरु थिरिमाने व मॅथ्यूज ही जोडी स्थिरावत असताना पदार्पणवीर सुंदरने थिरिमानेला माघारी धाडले. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याच्या नादात त्याला आपली यष्टी गमवावी लागली. त्यानंतर ठराविक अंतराने लंकेचे खेळाडू बाद झाल्याने लंकेचा ाुख निर्धारित षटके खेळण्यात अपयश ठरेल, असे वाटत होते. मात्र अनुभवी मॅथ्यूजने १३२ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह १११ धावांची नाबाद खेळी करत पराभवाचे अंतर कमी केले. मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने लंकेला १४१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून युजवेंद्र चहलने ३, जसप्रीत बुमराहने २, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताने कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमी द्विशतकाच्या आणि श्रेयस अय्यरच्या पहिल्यावहिल्या अर्धशतकाच्या जोरावर ४ बाद ३९२ धावांचा डोंगर उभा केला. धरमशाला येथील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभवानंतर मोहालीत रोहित शर्मा आणि शिखर धवनने संघाला शानदार सुरुवात करून दिली.
रोहित आणि शिखरमध्ये ११५ धावांची भागीदारी झाली. शिखर धवनने लंकेच्या सुमार गोलंदाजीचा फायदा घेत अर्धशतकी खेळी केली. धवनने ९ चौकारांसह ६८ धावा केल्या. त्यानंतर रोहित आणि श्रेयस अय्यरमध्ये द्विशतकीय भागीदारी झाली. श्रेयस अय्यरने आपले पहिले एकदिवसीय अर्धशतक झळकावले. अर्धशतकानंतर तो ८८ धावांवर बाद झाला. त्यानंतर धोनी (७) आणि हार्दिक पांड्या (८) धावा करून बाद झाला. मात्र रोहितने शेवटपर्यंत नाबाद २०८ धावा करत भारताला धावांचा डोंगर उभारून दिला. निर्णायक सामना १७ डिसेंबरला विशाखापट्टणम येथे होणार आहे.
धावफलक
भारत ः रोहित शर्मा नाबाद २०८ (१५३ चेंडू, १३ चौकार, १२ षटकार), शिखर धवन झे. थिरिमाने गो. पथिराना ६८, श्रेयस अय्यर झे. चतुरंगा गो. परेरा ८८, महेंद्रसिंग धोनी पायचीत गो. परेरा ७, हार्दिक पंड्या झे. थिरिमाने गो. परेरा ८, अवांतर १३, एकूण ५० षटकांत ४ बाद ३९२
गोलंदाजी ः अँजेलो मॅथ्यूज ४-१-९-०, सुरंगा लकमल ८-०-७१-०, थिसारा परेरा ८-०-८०-३, नुवान प्रदीप १०-०-१०६-०, अकिला धनंजया १०-०-५१-०, सचित पथिराना ९-०-६३-१, असेला गुणरत्ने १-०-१०-०.
श्रीलंका ः दनुष्का गुणथिलका झे. धोनी गो. बुमराह १६, उपुल थरंगा झे. कार्तिक गो. पंड्या ७, लाहिरु थिरिमाने त्रि. गो. सुंदर २१, अँजेलो मॅथ्यूज नाबाद १११, निरोशन डिकवेला झे. सुंदर गो. चहल २२, असेला गुणरत्ने यष्टिचीत धोनी गो. चहल ३४, थिसारा परेरा झे. धोनी गो. चहल ५, सचित पथिराना झे. धवन गो. भुवनेश्वर २, अकिला धनंजया झे. शर्मा गो. बुमराह ११, सुरंगा लकमल नाबाद ११, अवांतर ११, एकूण ५० षटकांत ८ बाद २५१.
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार ९-०-४०-१, हार्दिक पंड्या १०-०-३९-१, जसप्रीत बुमराह १०-०-४३-२, वॉशिंग्टन सुंदर १०-०-६५-१, युजवेंद्र चहल १०-०-६०-३, श्रेयस अय्यर १-०-२-०.
‘हिटमॅन’चे दुहेरी शतक
हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणार्या रोहित शर्माने लंकेविरुद्ध मोहालीत शानदार द्विशतक ठोकले. त्याच्या कारकिर्दीतील हे तिसरे द्विशतक आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तीन द्विशतके झळकावणारा रोहित हा जगातील पहिलाच खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर (नाबाद २००), वीरेंद्र सेहवाग (२१९), ख्रिस गेल (२१५) व मार्टिन गप्टिल (नाबाद २३७) यांनी प्रत्येकी एक द्विशतक ठोकले आहे. रोहित शर्माने आपले पहिले द्विशतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ नोव्हेंबर २०१३ला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ठोकले होते. या सामन्यात रोहितने १०८ चेंडूंचा सामना करताना १२ चौकार आणि १६ षटकारांसह २०९ धावांची खेळी केली होती. यानंतर कोलकाताच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्सच्या मैदानावर १३ नोव्हेंबर २०१४ला पुन्हा एकदा रोहितचे वादळ घोंगावले होते. लंकेविरुद्धच्या या सामन्यात रोहितने १२५ चेंडूंचा सामना करताना ३३ चौकार आणि ९ षटकारांसह २६४ धावांची तुफानी खेळी केली होती.
कालच्या सामन्यात शतक पूर्ण करण्यासाठी रोहितने ११५ चेंडू घेतले होते. पुढील शंभर धावा केवळ ३६ चेंडूंत करत त्याने आपली क्षमता दाखवून दिली. रोहितने या सामन्यात १२ षटकार लगावून यंदाच्या वर्षी आपल्या षटकारांची संख्या ४५ केली. एका कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक षटकार लगावणारा भारतीय म्हणूनही रोहितने आपले नाव नोंदविले आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर (१९९८, ४० षटकार) याच्या नावावर हा भारतीय विक्रम होता. आपले सोळावे वनडे शतक लगावून रोहितने वीरेंद्र सेहवाग (१५) याला मागे टाकले.
नुवान प्रदीपचे ‘शतक’
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान प्रदीपने आपल्या १० षटकांत १०६ धावा दिल्या. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तो संयुक्तपणे तिसरा सर्वांत महागडा गोलंदाज ठरला. इंग्लंडच्या माईक लुईसच्या नावावर सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम आहे. त्याने द. आफ्रिकेविरुद्ध १० षटकांत ११३ धावा दिल्या होत्या. ११० धावांसह पाकिस्तानचा वहाब रियाझ दुसर्या तर प्रदीप १०६ धावांसह तिसर्या क्रमांकावर आहे. भारताच्या भुवनेश्वर कुमार यानेदेखील १०६ धावा दिल्या आहेत. परंतु, त्याच्या नावावर एक बळी आहे. लुईस, रियाझ व प्रदीप यांना एकही गडी बाद करता आलेला नव्हता.