मगोच्या अन्य पक्षात विलिनीकरणाचा प्रस्ताव नाही

0
109

>> ढवळीकर : लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

मगो पक्षाची आमसभा १७ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता पर्वरी येथे घेण्यात येणार आहे. या आमसभेत विद्यमान केंद्रीय समितीला दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या आमसभेत नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना केंद्रीय समितीमध्ये स्थान मिळण्याची शक्यता मगो पक्षाचे नेते तथा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल व्यक्त केले.

मगो पक्ष एनडीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा आहे. याबाबत पक्षाच्या केंद्रीय समितीने निर्णय घेतला पाहिजे, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
मगो पक्षाने एनडीएचा घटक पक्ष व्हावा असा ठराव पक्षाच्या केंद्रीय समितीने संमत केलेला नाही. एनडीेएने केवळ आपणाला वैयक्तीक एनडीएचे निमंत्रण दिले. मगो पक्ष कुठल्याही पक्षात विलिनिकरण करण्याचा प्रस्ताव नाही, आमसभेच्या पार्श्‍वभूमीवर काही जणांकडून पक्षाबाबत चुकीची माहिती पसरवून कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मगो पक्षाचे विलिनिकरण करून मुख्यमंत्रीपद पटकाविण्याची दोनदा ऑफर आपणाला देण्यात आली. परंतु मगो पक्षाशी गद्दारी कदापी केली जाणार नाही, उलट पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. पक्षाची बदनामी करणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

मगो पक्षाचे कार्य तळागळात पसरविण्यावर भर दिला जात आहे. पक्षसंघटन मजबूत आहे. पक्षाच्या केंद्रीय समितीचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. पक्षाच्या केंद्रीय समितीला आणखी दोन वर्षाची मुदत वाढ आमसभेत ठरावानंतर मिळणार आहे, असे मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले. मगो पक्षात फूट घालण्याचे काही विघ्नसंतोषी लोकांकडून प्रयत्न केला जात आहे. पक्ष संघटनेची बदनामी करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला मगोचे सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर, कार्याध्यक्ष नारायण सावंत, उपाध्यक्ष रत्नकांत म्हार्दोळकर, नरेश सावळ, प्रताप फडते, प्रकाश नाईक, मिलिंद पिळगावकर, अभय प्रभू, नरेश गावडे यांची उपस्थिती होती.