ऍक्वा गोवा मत्स्य महोत्सव

0
90

– प्रमोद ठाकूर 

राज्य सरकारच्या मच्छिमारी खात्याकडून मागील पाच वर्षांपासून मच्छिमारी व्यवसायातील सर्वांना एकत्र आणून त्यांच्या समस्या, विचारांचे आदानप्रदान, मत्स्य व्यवसायातील नवीन बदलांची माहिती देण्यासाठी ‘मत्स्य महोत्सवा’चे आयोजन करण्यास सुरवात केली आहे. राज्यातील पहिला मत्स्य महोत्सव २०१३ मध्ये घेण्यात आला होता. गतवर्षी विधानसभा निवडणुकीमुळे हा महोत्सव होऊ शकला नाही. गुरुवार दि. ७ रोजी कांपाल पणजी येथील एसएजी मैदानावर चार दिवसीय ऍक्वा मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले आहे… त्यानिमित्ताने……

मच्छिमारी व्यवसायातून सामाजिक आणि आर्थिक विकास शक्य आहे. गोव्याला मोठी किनारपट्टी लाभलेली आहे. तसेच अंतर्गत नद्यासुध्दा जोडलेल्या आहेत. येथे मच्छिमारी व्यवसायाला चांगली संधी आहे. गोमंतकीयांच्या जेवणातील मासळी हा मुख्य अन्न-घटक म्हणून ओळखला जातो. समुद्रकिनारी भागात मासळी पकडली जाते. तसेच अंतर्गत नद्यांमध्येसुध्दा मासळी उपलब्ध आहे. राज्यात ऍक्वा कल्चरला चालना देण्याबरोबरच पारंपारिक मासळीचे सर्वंधन ही काळाची गरज आहे.
मच्छिमारी खाते राज्यातील मच्छिमारी समाजाला मत्स्य उत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्याचे कार्य करते. मच्छिमारी खात्याकडून मच्छिमारांना सहाय्य करून मत्स्य उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न केला जातो. सरकारकडून मत्स्य शेतीच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. या योजना मच्छिमारी समाजापर्यंत पोहोचल्या तरच मत्स्य उत्पादनात वाढ होऊ शकतेे. मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारनेसुध्दा ‘नीळ क्रांती’ ही योजना कार्यान्वित केली आहे.

मत्स्य व्यवसायाला आधुनिकतेची जोड मिळाल्याने आजच्या काळात हा एक महत्वाचा व्यवसाय बनला आहे. मच्छिमारातून स्वयंरोजगाराला चालना मिळते. मच्छिमारी व्यवसाय करणारी व्यक्ती बेकारांना रोजगारसुध्दा देऊ शकते. समुद्रातून पकडण्यात येणार्‍या मासळीची स्थानिक पातळीवर विक्री करण्याबरोबरच परदेशातसुध्दा निर्यात केली जात आहे. पूर्वी पारंपारिक पध्दतीने मच्छिमारी केली जात होती. आजही पारंपारिक पध्दतीने मच्छिमारी केली जाते. तसेच मच्छिमारीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरसुध्दा केला जात आहे. ट्रॉलर्स, बोटीच्या सहाय्याने मच्छिमारी केली जात असून जास्त मासळी पकडण्यासाठी एलईडी लाईट, बुल ट्रोवलिंगसारख्या घातक प्रकारांचासुध्दा वापर केला जातो. मत्स्यधनासाठी घातक एलईडी लाईट आणि बुल ट्रोवलिंगवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. याची योग्य पध्दतीने अंमलबजावणी होण्याची गरज आहे.

मच्छिमारी खात्याकडून पारंपारिक मच्छिमारांच्या उत्कर्षासाठी प्राधान्यक्रमाने प्रयत्न केला जातो. त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. तसेच मत्स्यशेती व्यवसाय सुरू करणार्‍यांनासुध्दा योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. कृत्रिम पध्दतीने मत्स्य पैदास करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मच्छिमारी खात्याकडून मच्छिमारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर कृत्रिम पध्दतीने मत्स्य पैदास केली जात आहे. नवीन आधुनिक पध्दतीच्या ऍक्वा कल्चरला प्रोत्साहन दिले जात आहे.

सरकारच्या योजना केवळ कागदावर राहू नये या उद्देशाने संबंधिताचे मेळावे घेतले जातात. या मेळाव्यातून विविध प्रकारची माहिती देऊन योजनांचा लाभ घेण्याची विनंती केली जाते. राज्य सरकारच्या मच्छिमारी खात्याकडून मागील पाच वर्षांपासून मच्छिमारी व्यवसायातील सर्वांना एकत्र आणून त्यांच्या समस्या, विचारांचे आदानप्रदान, मत्स्य व्यवसायातील नवीन बदलांची माहिती देण्यासाठी ‘मत्स्य महोत्सवा’चे आयोजन करण्यास सुरवात केली आहे. राज्यातील पहिला मत्स्य महोत्सव २०१३ मध्ये घेण्यात आला. गतवर्षी विधानसभा निवडणुकीमुळे तो होऊ शकला नाही. गुरुवार दि. ७ डिसेंबर २०१७ रोजी कांपाल पणजी येथे चौथ्या मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन नुकतेच राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याची सांगता १० डिसें, रोजी होणार आहे.

आजच्या काळात मासळी व्यवसायाला मोठे व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. केवळ मच्छिमारी बांधवांपुरता हा व्यवसाय मर्यादित राहिलेला नाही. तर वाहतूकदार, यंत्रसामुग्री व्यावसायिक, बँका, विमा, मासळी निर्यातदार अशा अनेकांचा मच्छिमारीशी संबंध येऊ लागला आहे. या सर्वांना एकाच व्यासपीठावर आणून विचारांचे आदानप्रदान, समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने ‘मत्स्य महोत्सवा’चे आयोजन केले जाते. मच्छिमारी बोटीसाठी मोटर व इतर उपकरणांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर बाजारात उपलब्ध आहेत. मोटरची विक्री करणारे व्यावसायिक या महोत्सवात मच्छिमारी बांधवांसमोर आपल्या उत्पादनाची माहिती देऊ शकतात. विमा, बॅँकाचे अधिकारी या महोत्सवामध्ये येऊन मच्छिमारांशी व्यवसायिक चर्चा करू शकतात. मच्छिमारीसाठी जाळी वापरली जातात. देशातील विविध भागातील जाळी तयार करणारे व्यावसायिक मच्छिमारांशी संवाद साधू शकतात.

ऍक्वा मत्स्य महोत्सवाची उद्दिष्टेराज्यातील मच्छिमारी समाजाला मासळीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रोत्साहन देणे, मच्छिमारांचा विकास साधणे, मत्स्यधनाचे संवर्धन व जतनासाठी मार्गदर्शन करणे, मच्छिमारी खात्याच्या विविध योजनांची मच्छिमारी समाजात जनजागृती करणे, मच्छिमारांना मार्गदर्शन करणे, राज्यात ऍक्वाकल्चरचा विकास साधणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत.
यामत्स्य महोत्सवामध्ये सकाळच्या सत्रात मत्स्य शेतीबाबत तांत्रिक माहिती, मार्गदर्शन शिबिर, चर्चासत्र, लेक्चरचे आयोजन केले गेले आहे. यात महाविद्यालयीन विद्यार्थी व व्यावसायिकांना समाविष्ट करून घेतले जाणार आहे. युवकांना आधुनिक मत्स्यशेतीबाबत माहिती देऊन मत्स्य उत्पादनाकडे वळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

शालेय मुलांमध्ये मासळीबाबत जागृतीसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यात कुंकीग, रांगोळी, चित्रकला, फॅन्सी ड्रेस, व्हेजिटेबल आणि फ्रुट कार्विंग यांसारख्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.मच्छिमारी उपकरणाची माहिती देणारे ४४ स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. मच्छिमारी खात्याचे विविध उपक्रम टीव्हीच्या माध्यमातून डिस्प्ले केले जात आहेत. मत्स्य महोत्सवामध्ये मच्छिमारी आणि मरीन लाईफसंबंधी माल व उत्पादनाची विक्री केली जात आहे. तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमसुध्दा आयोजित करण्यात आले आहेत. यात संगीत, फॅशन शो, गोवन डान्स व इतर कार्यक्रमांचा समावेश आहे. मेळाव्यात येणार्‍याच्या सोयीसाठी गोवन सी फूड व इतर प्रकारचे फूड उपलब्ध केले जाईल.

या मत्स्य महोत्सवाच्या ऍक्वेरीयम गॅलरीमध्ये आंतरराष्ट्रीय, भारतीय व गोव्यातील विविध शंभर प्रकारचे ऍक्वा फिश पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. राज्यातील बर्‍याच कुटुंबात ऍक्वा फिश ठेवले जातात. ऍक्वा फिश पाहण्यासाठी झुंबड पडत आहे.
आतापर्यतचे तीन ऍक्वा मत्स्य महोत्सव मडगाव व म्हापसा येथे घेण्यात आले. आता चौथा ऍक्वा मत्स्य महोत्सव राजधानी पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांबरोबर देशी व विदेशी पर्यटक सुध्दा या मत्स्य महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत.