जीव ओतून कष्ट केल्यास यश निश्‍चित ः वैशाली सामंत

0
189

शब्दांकन ः नितिन कोरगावकर

अष्टपैलू, पार्श्‍वगायिका, संगीतकार, गीतकार अशा अनेक पैलूंनी रसिकमान्यता मिळवलेल्या व भावगीत, चित्रपट, आयटम् सॉंगपासून पॉपपर्यंत विविध गीतप्रकार शैलीदारपणे गाणार्‍या रसिकप्रिय गायिका वैशाली सामंत यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच त्या ऍडवेन्झ ग्रुपच्या ‘युथ फॉर टूमॉरो’ इव्हेंटच्या निमित्ताने गोव्यात येऊन गेल्या.

ए. आर. रेहमानसारख्या ख्यातनाम संगीतकाराची गाणी, लगान, ताल, साथियामध्ये गाण्याचा मान मिळविलेल्या वैशाली सामंत विजू शाह, दाबू मलिक, अकबर सामी, सुकेतू, नाशा या संगीतकारांसाठीही गायल्या आहेत. ऐका दाजिबा…, कोंबडी पळाली, नाद खुळा, दूरच्या रानात… अशी त्यांची मराठी गाणी तर इतकी गाजली की आजही ती सर्वांनाच धुंद करतात. तरुणाईची पावले या गाण्यांवर आपसूकच थिरकतात. हिंदी, मराठीतच नव्हे तर बंगाली, भोजपुरी, तमीळ, आसामी, तेलगू, गुजराती अशा भाषांतही गाऊन त्या सर्वदूर पोचल्या आहेत.
वैशाली यांनी बॉलीवुड फिल्मसाठीही पार्श्‍

वगायन केले आहे. त्यात पद्मश्री लालूप्रसाद यादव, गर्लफ्रेन्ड, मालामाल, विकली, मेरी कसम, चेतना, दिल जो भी कहे, ट्राफिक सिग्नल, मीर्च या चित्रपटांचा समावेश आहे. केहे दू तुम्हे, सजना है मुझे, जवान है मुहब्बत, ढगाला लागली खळ, तू तू है ओही, दिलबर दिल से… ही त्यांची रिमिक्स गाणी रसिकांनी उचलून धरली.

‘युथ फॉर टूमॉरो’च्या वेळी पणजी येथे इन्स्टिट्यूट ब्रागांझामध्ये त्यांचे गायन असतानाही त्यांनी मुलाखत दिली. अगदी दिलखुलासपणे त्या बोलल्या. एवढ्या मोठ्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या गायिकेशी आपण संवाद साधतोय असं कुठेच जाणवलं नाही. त्यांच्या बोलण्यात कुठेच अहंभाव नव्हता. अत्यंत निर्मळ मनाने त्यांनी प्रश्नाला उत्तरं दिली. नवीन पिढीतील गायक-गायिकांनी त्यांच्याकडून हे शिकण्यासारखे आहे. मलाच उलट मी त्यांना तसदी देतोय असे राहून राहून वाटत होते. ‘‘मला आता गायचे आहे, लवकर आटपा…’’ असा सूर कुठेच नव्हता. त्या भरभरून सांगत होत्या. २००५ मध्ये कला अकादमीत झालेल्या त्यांच्या शोच्या वेळी असाच त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता. त्यावेळच्या वैशाली आजही तितक्याच नम्र आहेत.

* तुम्ही संगीताकडे कशा वळलात? तुमच्या घराण्यात कोणी गायक, वादक होते का?

– तसं पाहिलं तर आमच्या घरात संगीताचा वारसा नव्हता. माझे आजोबा मृदंग वाजवायचे परंतु केवळ हौस म्हणून. आमच्या कुटुंबात गायक वगैरे कोणीच नव्हते. मात्र आमच्या घरात सर्व प्रकारचे संगीत ऐकले जायचे. कुठलाही संगीताचा प्रकार निषिद्ध नव्हता. पण मी मात्र लहानपणीच शास्त्रीय संगीत शिकायला लागले. प्रसिद्ध नाट्यगीत गायिका ज्योत्स्ना मोहिले, जयंत दातार यांच्याकडे सुरवात झाली. मग बुजुर्ग कलाकार पं. मनोहर चिमोटे मला गुरू म्हणून लाभले.

*  शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत होता, मग पुढे शास्त्रीय गायिका व्हावे असे तुम्हाला वाटले नाही का?

– मी जरी शास्त्रीय संगीत शिकत होते, तरी मला पॉपही आवडायचे. मला माझ्या गाण्याला मर्यादा घालून घ्यायच्या नव्हत्या. सर्व तर्‍हेचे गाणे गाता यायला हवे… याकडे माझा कटाक्ष होता. त्याप्रमाणे मी अनेक प्रकार गायला लागले व त्यातून मी आनंद घेतला. जे गायले ते मात्र मनापासून!

*  गाण्यात करिअर करावे.. असे तुम्हाला नेमके कधी वाटले?

– मी त्यावेळी विलेपार्ले येथे एका स्पर्धेत गायले होते आणि पं. सुरेश वाडकर तेथे उपस्थित होते. त्यांनी माझे ते गाणे ऐकून माझे आवर्जून कौतुक केले आणि मला म्हणाले, ‘‘तुझा आवाज खूप चांगला आहे. शिकत रहा, चांगली पार्श्‍वगायिका बनशील.’’ या त्यांच्या वाक्याने मला प्रेरणा मिळाली. एरवी आमचे घराणे टिपिकल महाराष्ट्रीयन. मला डॉक्टर किंवा इंजिनिअर बन, असेच घरातून सांगितले गेले असते. परंतु मला घरच्यांनी सांगितले की वेगळं काही करून दाखवायचे असेल तर या क्षेत्रात पाऊल टाक. त्याप्रमाणे मी या क्षेत्रात उडी टाकली आणि निश्चित ध्येय गाठण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि आज वेगवेगळ्या भाषेतील, वेगवेगळ्या प्रकारची, मूडची गाणी गाऊ शकते. पार्श्‍वगायिका म्हणून यश मिळवले आहे. खरोखरच जीवनाचे सार्थक झाले.

*  पार्श्‍वगायिका म्हणून तुमच्या जीवनाला कलाटणी कधी मिळाली?

– २००० साली ‘सागरिका म्युझिक’ने माझा पहिला अल्बम् काढला आणि ‘ऐका दाजिबा..’ हे त्यातील गाणे एवढे गाजले की मला नाव, कीर्ती, लोकप्रियता या एका गीताने मिळवून दिले. मग मात्र मी मागे वळून पाहिले नाही. दरम्यान मी छोटे-छोटे कार्यक्रम करीत होते, रेकॉर्डिंग केलेली. पण ‘ऐका दाजिबा’ने मला पहिली ओळख दिली हे मात्र नक्की. मी कुठल्याही ‘गॉड फादर’मुळे पुढे आले नाही. ‘ऐका दाजिबा’नंतर मला मोठमोठे ‘शो’ मिळत गेले आणि ऐका दाजिबा हे गाणे त्या शोचा अपरिहार्य भाग बनला. त्या गाण्याला ‘वन्स मोअर’ मिळाला नाही.. असे कधी घडले नाही.

* तुम्ही मराठी, हिंदीबरोबरच तेलगू, तमीळ, गुजराती, भोजपुरी, बंगाली, कोंकणी आदी भाषांतही गायला आहात. वेगळ्या भाषांत गाताना तुम्हाला त्या भाषांची जुजबी माहिती वगैरे अवगत करावी लागली का? आणि एकंदरित त्या भाषांत गायचा अनुभव कसा होता?

– इतर भाषांत गाताना त्या भाषा शिकायलाच हव्यात किंवा अवगत असायला हव्यात असे नाही. इतर भाषांतील उच्चार, शब्दांचा लेहजा, त्यातील गोडवा समजून घ्यावा लागतो आणि एकदा तो जमला की त्यातून मिळणारा आनंद खूप मोठा असतो.

* पार्श्‍वगायिका म्हणून पुढे येण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला का?

– कुठलेही क्षेत्र असो, प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रात नाव-कीर्ती मिळविण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. मी अजूनही संघर्ष करतेय कारण मला नवनवीन गाण्याचे प्रकार गाण्यात शंभर टक्के माझे कौशल्य देता आले पाहिजे.

* तुम्ही सोनू निगम, शंकर महादेवन यांसारख्या आजच्या लोकप्रिय कलाकारांबरोबर आशाताई, लतादीदी यांच्याबरोबरही गायल्या आहात. हा अनुभव अर्थातच ऐकायला आवडेल. लता दीदींबरोबर गाताना तुमच्यावर दडपण होते का?

– लता दीदींबरोबर गाणे हे दैवीच म्हणायला हवे. लतादीदी, आशाताई या तर व्यक्ती नसून संस्थाच आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांच्याबरोबर गातांना त्यांनी दडपण येऊ दिले नाही. त्यांच्याबरोबर गाताना मला मात्र कळून चुकले की त्या त्यांच्या स्थानावर का आहेत!!

* संगीतकार म्हणून तुमची कारकीर्द कधी सुरू झाली?

– एकदा केदार शिंदे यांनी मला एका चित्रपटासाठी गाणे ‘कंपोज’ करशील कां असे विचारले? पडद्यावर ‘फ्रेश’ जोडी होती व त्यांच्यावर ते गीत शूट करायचे होते. मी ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि मला आत्मविश्‍वास मिळाला. आणि मग आठ चित्रपटांचे संगीतदिग्दर्शन केले. साधना सरगम, अवधुत गुप्ते, उषा उत्थुप, स्वप्नील बांदोडकर एवढेच नव्हे तर पं. सुरेश वाडकरांनीही मला संगीत दिग्दर्शक म्हणून स्वीकारले हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. आता ‘ये रे, ये रे पावसा’ चित्रपटाची गाणी मी करतेय. ना.धो. महानोरांच्या गीतांचा एक अल्बम करतेय. एक मात्र खरे, मी जे जे संगीत क्षेत्रात करत गेले तिथे यश मिळाले. हे जमलं नाही, हे कळलं नाही, असे कधी झाले नाही.

* तुम्ही एखाद्या संगीतकाराचे गीत गाता तेव्हा एखादी चांगली सुचलेली जागा, हरकत घ्यायला संगीतकार मुभा देतात कां?

– एखाद-दुसरा संगीतकार असा असतो की तो इकडचे तिकडे करायला देत नाही. ‘कट् टू कट्’ त्याला गायलेले हवे असते. परंतु बहुतेक संगीतकार गीत संगीतबद्ध केल्यानंतर ते गायकाचे असते अशा भावनेने चांगले वेगळेकाही आले तर ते आनंदाने स्वीकारतात. छान छान जागा शोधून गाणं अधिक चांगलं करता येतं. गाण्याच्या मूडप्रमाणे ‘माईंड सेट’ हवा याचे गायकाला व संगीतकाराला भान असणे महत्त्वाचे असते.

* दूरदर्शन वाहिन्यांवरील स्पर्धात्मक कार्यक्रमात परीक्षक म्हणून सहभागी होतानाचा अनुभव कसा असतो?

– परिक्षकाच्या भूमिकेतून अनेक नवनवीन तरुण कलाकारांना ऐकताना काही शिकता येते, आपली उजळणी होते. नवीन पिढीकडून नवीन काही ऐकायला मिळते मग आपलीही जबाबदारी वाढते.

* एक अष्टपैलू यशस्वी गायिका म्हणून नव्या पिढीला तुम्ही काय सांगाल?

– कुठल्याही क्षेत्रात पुढे यायचे असेल तर कष्ट हे काढायलाच हवेत. आणि जे करता ते अगदी मनापासून, जीव ओतून केले पाहिजे. स्वतःला आधी ओळखलं पाहिजे. म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करायला मार्ग सापडतो. आजच्या युगात बहुकौशल्य असणे महत्त्वाचे आहे. संगीत क्षेत्रात नावलौकीक मिळवायचा असेल तर, एकाच गीतप्रकाराला चिकटून चालणार नाही. पार्श्‍वगायकाला एक कुठला प्रकार धरून चालत नाही. वेगवेगळे प्रकार गाता आले पाहिजेत. त्यादृष्टीने त्यांनी विचार करायला हवा.

* तुम्ही ऍडवेन्झ ग्रुपच्या ‘युथ फॉर टूमॉरो’ कार्यक्रमात गोव्यात सहभागी झालात. अशा प्रकारचे स्पर्धात्मक कार्यक्रम उदयोन्मुख तरुण कलाकारांना पुढे येण्यास कितपत् उपयुक्त ठरतात?

– ‘ऍडवेन्झ ग्रुप’चा युथ फॉर टूमॉरो’ हा उपक्रम खूप चांगला आहे. दर्जेदार व्यासपीठ त्यातून देण्याचा प्रयत्न आहे आणि व्यासपीठांवरूनच तरुण कलाकारांना उत्तेजन मिळत असते. पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळत असते. मी स्वतः अशा स्पर्धात्मक व्यासपीठावरूनच प्रेरणा घेतली आहे. तेव्हा ऍडवेन्झ ग्रुप’च्या उपक्रमाचे मी अभिनंदन करते.