युकी भांब्री व युवा सुमीत नागल यांनी परस्परविरोधी विजय मिळवत बेंगळुरू ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
रामकुमार रामनाथन याला मात्र एटीपी चॅलेंजर प्रकाराच्या या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. तिसर्या मानांकित भांब्रीने स्पेनच्या पेद्रो मार्टिनेध याचा ६-२, ७-६ (०) असा पराभव केला तर कडव्या झुंजीनंतर नागलने ब्रिटनच्या ब्रायडन क्लेन याचा प्रतिकार ६-४, ४-६, ७-५ असा मोडून काढला.
अन्य एका सामन्यान प्रज्ञेश गुणेश्वरनने ऑस्ट्रेलियाच्या मार्क पोलमन्स याला ६-२, ६-७ (१), ६-१ असे हरविले. पाचव्या मानांकित रामकुमारचा पराभव पात्र चटका लावणारा ठरला. ब्रिटनच्या जेय क्लार्क याने रामकुमारचे आव्हान ७-६ (३), २-६, ४-६ असे परतवून लावले. पोलमन्सचा सामना करण्यापूर्वी प्रज्ञेशने सहावे मानांकन लाभलेल्या ब्रिटनच्या इव्हान किंग याला ६-४, ६-४ असे लोळविले होते. या विजयासह त्याने केपीआयटी-एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेतील पराभवाचा वचपादेखील काढला होता. प्रज्ञेशने रामकुमारसह खेळताना स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरुष दुहेरीत विजयी सुरुवात करताना सूरज प्रबोध व नितीन कुमार सिन्हा यांना ६-२, ६-२ असे हरविले होते.