>> महानायक अमिताभला गौरविणार
>> ‘बियॉंड द क्लाऊड्स’ने पडदा उघडणार
४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आघाडीचे सीने अभिनेते शाहरूख खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्यात ख्यातनाम सीने अभिनेता, महानायक अमिताभ बच्चन यांना ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान राजधानी पणजीत इफ्फी संपन्न होणार आहे. यंदाच्या महोत्सवाचा पडदा इराणी चित्रपट ‘बियॉंड द क्लाऊड्स’ने उघडणार आहे.
इफ्फीच्या उद्घाटनासाठी अनेक दिग्गज कलाकारांच्या नावांवर चर्चा करण्यात आल्यानंतर शेवटी सीने अभिनेते शाहरूख खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शाहरूख खान यांनी यापूर्वी दोन वेळा इफ्फीचे उद्घाटन केले आहे. त्यांना २००७ आणि २०११ मध्ये इफ्फीचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. आता तिसर्यांदा २०१७ मध्ये पुन्हा एकदा इफ्फीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
महानायक अभिताभ बच्चन यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानायक अभिताभ बच्चन यांनी आजवर असंख्य भूमिकांना न्याय देत चित्रपट सृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे.
चित्रपट सृष्टीतच नव्हे तर सरकारच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला आहे. स्वच्छ भारत अभियानासह विविध उपक्रमांसाठी बच्चन यांची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून निवडही करण्यात आली होती. उद्घाटन सोहळ्यात भारतीय चित्रपट उद्योगावर आधारित रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यानंतर कला अकादमीमध्ये इराणी फिल्ममेकर माजिद माजिदी दिग्दर्शित ‘बियॉंड द क्लाऊड्स’ या चित्रपटाने इफ्फीचा पडदा उघडणार आहे. ऑस्कर पुरस्कार विजेते ए. आर. रेहमान व भारतीय चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज यांचे माजिदी यांना चित्रपटासाठी सहकार्य लाभले आहे. ते उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. इफ्फीचा समारोप अर्जेटिनाचे फिल्ममेकर पाबलो सिझर यांच्या ‘थिंकिंग ऑफ हिम’ या चित्रपटाने होणार आहे. पाबलो यांच्यासह चित्रपटाची टीम समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.
‘न्यूड’, ‘सेक्सी दुर्गा’
वगळणे योग्यच : पर्रीकर
इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागाच्या यादीतून ‘न्यूड’ व ‘सेक्सी दुर्गा’ हे चित्रपट वगळण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. ‘न्यूड’ हा मराठी चित्रपट पूर्ण झालेला नव्हता. तो अर्धवट अवस्थेत इफ्फीसाठी पाठवण्यात आला होता. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्रही नव्हते. तर ‘सेक्सी दुर्गा’ यापूर्वी दोन वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांत पाठवण्यात आला होता. तिथे काही आक्षेपार्ह दृश्ये गाळून तो दाखवण्यात आला होता. इफ्फीला पाठवताना सदर आक्षेपार्ह दृश्यांना कात्री लावण्यात आली नव्हती. त्यामुळे दोन्ही चित्रपट वगळण्यात आल्याचे पर्रीकर म्हणाले.