राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचा कारभार असमाधानकारक असल्याचा मगो पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बहुतांश पदाधिकार्यांनी केलेल्या आरोपावर भाष्य करण्यास भाजपने काल नकार दिला.
मगो पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सोमवारी घेण्यात आलेल्या बैठकीत मगो पक्षाच्या समितीच्या बहुतांश पदाधिकार्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या कारभाराबाबत असमाधान व्यक्त केले होते. भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत मगो पक्षाच्या बहुतांश पदाधिकार्यांनी केलेल्या आरोपावर चर्चा केल्यानंतर या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे यांनी दिली.
मगो पक्षाच्या पदाधिकार्यांनी केलेल्या आरोपावर थेट प्रतिक्रिया व्यक्त करण्यास भाजपचे राज्य सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनीही नकार दिला.
मगो पक्षाच्या पदाधिकार्यानी अंतर्गत विषयावरून सरकारच्या कारभाराबाबत असमाधान व्यक्त केले होते. त्यामुळे त्याच्यावर आत्ताच भाष्य करणे योग्य होणार नाही, असेही तानावडे यांनी सांगितले.