किर्लपाल दाबाळ पंचायत क्षेत्रातील सर्व ट्रक मालकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काल सोमवारी सकाळी खास बैठक पंचायतीत घेण्यात आली. यावेळी वेदांत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जोजेफ कुएलो, उपसरपंच शशिकांत गावकर, पंच रमाकांत गावकर, व अन्य पंचसदस्यांसोबत ट्रकमालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी २० सदस्यांच्या नवीन समितीची निवड पंचायत पातळीवरील प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी करण्यात आली.
किर्लपाल पंचायत क्षेत्रातील अंदाजे ३८० ते ४०० ट्रकांना वेदांत कंपनीत सामावून घ्यावे तसेच कोडली-सावर्डे व कोडली-आमोणा मार्गावर पंचायत क्षेत्रातील ट्रकांना काम द्यावे. या दोन मागण्या कंपनीचे अधिकारी कुएलो यांनी मान्य केल्या. मात्र पंचायत क्षेत्रातील ट्रकांना आठवड्यातून ३ दिवस काम न देता सर्व दिवस काम देत नुकसानातून बाहेर काढण्याच्या मागणीची दखल कंपनीच्या अधिकार्यांनी घेतली नाही.
उपसरपंच शशिकांत गावकर यांनी पंचायत पातळीवरील ट्रक मालकांना सध्या नुकसानीचा फटका बसत आहे. त्यादृष्टीने पंचायतर्फे ट्रक मालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पंचायत पातळीवरील ट्रकमालकांच्या दोन मागण्या त्वरित मान्य झाल्या आहेत. मात्र काम अधिक देण्याच्या मागणीबद्दल अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही. कंपनीच्या अधिकार्यांशी चर्चा करण्यासाठी खास पंचायत पातळीवरील २० सदस्यीय समितीची निवड करण्यात आली आहे. सध्या सरकार पातळीवर वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असून त्यात लवकरच तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे शशिकांत गावकर यांनी सांगितले.