श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून सलामीवीर मुरली विजय याचे संघात पुनरागमन झाले आहे. मनगटाच्या दुखापतीमुळे दोन महिन्यांपूर्वी लंका दौर्यावरून माघारी परतावे लागल्यानंतर विजयची ही पहिलीच कसोटी मालिका असेल. तमिळनाडू संघातील आपला सलामी जोडीदार अभिनव मुकुंद याची त्याने भारतीय संघात जागा घेतली आहे.
रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा व कुलदीप यादव या फिरकीपटूंना प्राधान्य देण्यात आले आहे. उमेश यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार व ईशांत शर्मा या चार तज्ज्ञ जलदगती गोलंदाजांच्या जोडीला हार्दिक पंड्याच्या रुपाने मध्यमगती गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध आहे. या मालिकेसाठी अजिंक्य रहाणे याला उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे.
यंदा मार्च महिन्यात शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर विजयला लंकेविरुद्धच्या तिन्ही सामन्यांना मुकावे लागले होते. यानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये त्याने केवळ एका रणजी सामन्यात तमिळनाडूचे प्रतिनिधित्व केले. दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ग्रीन संघाकडून एक सामना तसेच तमिळनाडू प्रीमियर लीगमधील चार सामने तो खेळला आहे. श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका १६ नोव्हेंबर रोजी ईडन गार्डनवरील सामन्याने सुरुवात होणार आहे. नागपूर येथे २४ पासून दुसरा कसोटी सामना खेळविला जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे विश्रांतीची मागणी केल्याने लंकेविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यासह टी-२० व एकदिवसीय मालिकेसाठी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.
कसोटी संघ ः विराट कोहली, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, वृध्दिमान साहा, ईशांत शर्मा, शिखर धवन, उमेश यादव, मुरली विजय व हार्दिक पंड्या.