
>> लेथमचे शतक ठरले निर्णायक, कोहलीची सेंच्युरी व्यर्थ
मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात काल टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज टॉम लेथम याने नाबाद शतक झळकावून रॉस टेलर (९५) याच्यासह २०० धावांची भागीदारी करत संघाला विजयी केले. भारताने विजयासाठी ठेवलेले २८१ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडचे ६ गडी व ६ चेंडू राखून गाठले. किवीज संघाच्या या विजयामुळे विराट कोहलीच्या १२१ धावा व्यर्थ ठरल्या.
आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना गप्टिल आणि मन्रो यांनी ४८ धावांची सलामी दिली. बुमराहच्या गोलंदाजीवर मन्रो २८ धावा करून पहिल्या गड्याच्या रुपात बाद झाला. त्यानंतर १२ धावांची भर पडत नाही तोच कर्णधार केन विल्यमसनला कुलदीपने केदार जाधवकरवी वैयक्तिक ६ धावांवर बाद करत पाहुण्यांना दुसरा धक्का दिला. एक बाजू लावून धरलेला गप्टिलही १८व्या षटकात ३२ धावा करून बाद झाला. ८० धावांत तीन बळी गमावल्याने पाहुण्या संघावर दबाव आला. मात्र या दबावाचा ङ्गायदा घेण्यात भारताचे गोलंदाज कमी पडले. रॉस टेलर आणि टॉम लेथम जोडीने पाहुण्या संघाचा डाव सावरत गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांमध्ये चौथ्या गड्यासाठी २०० धावांची भागीदारी झाली. यादरम्यान टॉम लेथमने आपले शतक साजरे केले. विजयासाठी एका धावेची गरज असताना रॉस टेलर ९५ धावा काढून बाद झाला. भुवीने चहलकरवी त्याला बाद केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पुढच्याच चेंडूवर हेन्री निकोल्सने चौकार ठोकत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. लेथमने नाबाद १०२ धावा केल्या. यात त्याच्या ८ चौकारांचा आणि २ षटकारांचा समावेश आहे. भारताकडून भुवी, बुमराह, पंड्या आणि चहलने प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी, भारतीय संघाने कर्णधार विराट कोहलीच्या शतकावर आरुढ होत २८० धावांपर्यंत मजल मारली. दोन्ही सलामीवीरांच्या अपयशानंतर कोहलीने स्वतः जबाबदारी उचलत मोठी खेळी साकारली. तळाला भुवनेश्वरने १५ चेंडूंत २६ धावा करत मोलाचे योगदान दिले. आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यानंतरही गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारताचा पराभव झाला. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २५ तारखेला पुण्यामध्ये रंगणार आहे.
धावफलक
भारत ः रोहित शर्मा त्रि. गो. बोल्ट २०, शिखर धवन झे. लेथम गो. बोल्ट ९, विराट कोहली झे. बोल्ट गो. साऊथी १२१, केदार जाधव झे. व गो. सेंटनर १२, दिनेश कार्तिक झे. मन्रो गो. साऊथी ३७, महेंद्रसिंग धोनी झे. गप्टिल गो. बोल्ट २५, हार्दिक पंड्या झे. विल्यमसन गो. बोल्ट १६, भुवनेश्वर कुमार झे. निकोल्स गो. साऊथी २६, कुलदीप यादव नाबाद ०, अवांतर ८, एकूण ५० षटकांत ८ बाद २८०
गोलंदाजी ः टिम साऊथी १०-०-७३-३, ट्रेंट बोल्ट १०-१-३५-४, ऍडम मिल्ने ९-०-६२-०, मिचेल सेंटनर १०-०-४१-१, कॉलिन डी ग्रँडहोम ४-०-२७-०, कॉलिन मन्रो ७-०-३८-०
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल झे. कार्तिक गो. पंड्या ३२, कॉलिन मन्रो झे. कार्तिक गो. बुमराह २८, केन विल्यमसन झे. जाधव गो. कुलदीप ६, रॉस टेलर झे. चहल गो. भुवनेश्वर ९५, टॉम लेथम नाबाद १०३, हेन्री निकोल्स नाबाद ४, अवांतर १६, एकूण ४९ षटकांत ४ बाद २८४
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार १०-०-५६-१, जसप्रीत बुमराह ९-०-५६-१, कुलदीप यादव १०-०-६४-१, हार्दिक पंड्या १०-०-४६-१, युजवेंद्र चहल १०-०-५१-०
विक्रमवीर ‘किंग’ कोहली
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने १२१ धावांची खेळी साकारली. एकदिवसीय कारकिर्दीतील त्याचे हे ३१वे शतक ठरले. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याच्या ३० शतकांच्या विक्रमाला मागे टाकले. तसेच या खेळीदरम्यान त्याने वेस्ट इंडीजचा शिवनारायण चंदरपॉल (८७७८ धावा) व पाकिस्तानचा सईद अन्वर (८८२४ धावा) यांना मागे टाकत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्यांच्या यादीत १९वा क्रमांक प्राप्त केला. कोहलीच्या नावावर २०० सामन्यांत ८८८८ धावांची नोंद झाली आहे. ५५.५५च्या सरासरीने त्याने या धावा केल्या आहेत. यंदाच्या कॅलेंडर वर्षांत तर त्याने ७७.५२च्या सरासरीने १३१८ धावा जमवल्या आहे. यंदा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला व एकमेव आहे.