एसटी संपामुळे दुसर्‍या दिवशीही कदंब बसेस बंद

0
119

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे महाराष्ट्रात जाणार्‍या कदंब महामंडळाच्या बसेस काल दुसर्‍या दिवशीही बंद राहिल्या. त्यामुळे कदंब महामंडळाला लाखो रु.चे नुकसान झाले असून गोव्यातून महाराष्ट्रात जाण्याच्या तयारीत असलेल्या शेकडो लोकांची ऐन दिवाळीच्या दिवसांत अत्यंत गैरसोय झाली. या संपामुळे मंगळवार व बुधवार असे दोन दिवस कदंब महामंडळाला प्रत्येकी ४.५ लाख रु. चे नुकसान झाल्याचे कदंब महामंडळाचे ओएसडी (वाहतूक) एस. एल. घाटे यांनी काल सांगितले. या संपामुळे कदंब महामंडळाच्या सांगली, विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, कोल्हापूर आदी मार्गांवरील बसेस दोन दिवस बंद राहिल्या. महामंडळाच्या एकूण २९ गाड्या काल बंद राहिल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई, पुणे, सोलापूर रात्रीच्या बसेस चालू
मात्र, गोव्याहून मुंबई, पुणे, सोलापूर, शिर्डी आदी ठिकाणी जाणार्‍या रात्रीच्या बसेस चालू असल्याचे घाटे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र एसटी कर्मचार्‍यांचा संप चालू असताना आमच्या बसेस चालू ठेवून धोका पत्करायचा नाही. त्यामुळे आम्ही बसेस बंद ठेवल्याचे घाटे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र एसटी कर्मचार्‍यांचा संप मिटल्यानंतर बससेवा पुर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.