राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड ४ नोव्हेंबरला शक्य

0
120

अखिल भारतीय कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक येत्या २४ ऑक्टोबरला होत असून त्यात पक्षाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल व राहुल गांधी यांची कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड ४ नोव्हेंबर रोजी होणार्‍या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.

पक्ष कार्यकारिणी बैठकीत पक्षाध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीच्या तारखा घोषित होणार आहेत. त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन ४ नोव्हेंबर रोजी अपेक्षित असून त्यात राहुल गांधी यांच्या नावावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता आहे.

राहुल यांच्याकडे कॉंग्रेस अध्यक्षपदाची धुरा देण्याचे जवळजवळ निश्‍चित झाले असून स्वतः सोनिया गांधी यांनी तसे सूतोवाच केले आहे. गोव्यासह अनेक राज्यांतील प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणींनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ठराव संमत केलेले आहेत.

गुजरातसह काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर असून त्यामुळे कॉंग्रेसने राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पक्षाचा चेहरा म्हणून पुढे करण्याचे ठरवले आहे.