गोवा विद्यापीठ निवडणुकीत भाजपप्रणीत गट बिनविरोध

0
192

>> विरोधी संघटनांचा बहिष्कार

गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या काल घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपप्रणीत गटाची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत भाजपविरोधी विद्यार्थी संघटनांनी बहिष्कार घालून प्रशासकीय इमारतीमध्ये धरणे धरले. यावेळी विद्यार्थी मंडळ निवडणूक खुल्या पद्धतीनेघेण्याची मागणी विरोधी संघटनांनी केली. विद्यार्थी मंडळाची निवडणूक रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजप विरोधी विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.

गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणीत गटाच्या विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर कॉंग्रेसप्रणीत एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, आपच्या सीआयएसएस, युवा सेना, जन सेना या विद्यार्थी संघटनांच्या गटांनी बहिष्कार घालता. त्यामुळे भाजपप्रणीत गटाची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी निवडून आलेल्या विद्यापीठ प्रतिनिधींवर दबाव आणण्यासाठी पर्वरी येथे विद्यापीठ प्रतिनिधींची सभा घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला.

दरम्यान, विद्यापीठाच्या नूतन मंडळाने विद्यार्थी वर्गाच्या हितार्थ कार्य करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी केले. भाजप मुख्यालयात खासदार तेंडुलकर यांच्या हस्ते बिनविरोध निवड झालेल्या विद्यार्थी मंडळावरील पदाधिकार्‍यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, माजी आमदार दामू नाईक यांची उपस्थिती होती. गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजप विरोधी विद्यार्थी गट निवडणूक कार्यक्रमात अडथळा आणण्यासाठी खुल्या पद्धतीने निवडणूक घेण्याची मागणी करीत आहेत. गोवा विद्यापीठासाठी सध्याची निवडणूक पद्धत योग्य आहे, असे सिध्देश नाईक यांनी सांगितले.

गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळ
अध्यक्ष – उर्वेश रेडकर वेलिंगकर, सरचिटणीस – निशिकर पी. राऊत देसाई, महिला प्रतिनिधी – शांभवी गाडगीळ, सदस्य – सुमेध आठले, जोसेफ लोबो, दत्तप्रसाद देसाई, बालकृष्ण थळी, संदेश पालकोंडा, कृष्णा गवस.