गोव्यात आज ब्राझील-नायजर, कॉस्टा रिका-इराण सामने

0
100

फिफा अंडर-१७ विश्वचषक स्पर्धेत आज गोव्यात फातोर्डाच्या पं. नेहरू स्टेडियमवर ब्राझील-नायजर आणि कॉस्टा रिका-इराण यांच्या सामने होणार आहेत.

ब्राझील संघाने स्पेन आणि उत्तर कोरिया यांच्यावर मात करीत ६ गुणांसह अंतिम सोळा संघात स्थान निश्‍चित केलेले आहे. आणि आजच्या सामन्यात नायजरचा पराभव करीत ९ गुणांसह गटात गटात अग्रस्थानवर राहत बाद फेरीत प्रवेश हेच त्यांचे लक्ष्य असेल. या सामन्याद्वारे जेतेपदाचा दावेदार मानल्या जाणार्‍या ब्राझील संघाचा खेळ पाहण्याची संधी गोमंतकीय फुटबॉल प्रेमींना लाभणार आहे. त्यांच्या लिंकन, पावलिन्हो आणि ब्रेनेर या त्रिकुटाने चांगला खेळ करीत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकण्यात यश मिळविलेले आहे. मार्कोस आंतोनियो आणि एलेन सूजा हे मध्यफळीत चांगली कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे स्पर्धेत प्रथमच खेळणार्‍या नायजर संघाला त्यांना रोखणे तेवढे सोपे जाणार नाही. नायजर संघाने उत्तर कोरियावर मात करीत ३ गुण मिळविलेले असून त्यांचे लक्ष्यही आणखी एका आश्‍चर्यकारक विजयासह बाद फेरीत प्रवेश मिळविण्यावर असेल. दरम्यान, याच मैदानावर रात्री ८ वा. कॉस्टा रिका आणि इराण यांच्यात लढत होणार आहे. इराणने आपले दोन्ही सामने जिंकत यापूर्वीच बाद फेरीत प्रवेश केलेला आहे. त्यांचा खेळ पाहता कॉस्टा रिकाला ही लढत सोपी जाणार नाही हे मात्र निश्‍चित.