
दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या कसोटीत डावाने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बांगलादेशचा संघ आजपासून सुरू होणार्या दुसर्या कसोटी सामन्यात सुधारित कामगिरीसाठी प्रयत्न करणार आहे. स्फोटक सलामीवीर तमिम इक्बालच्या अनुपस्थितीत कमकुवत बनलेल्या बांगलादेशचा संघ हा सामना अनिर्णीत राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल तर यजमान संघाने पाहुण्यांवर पुन्हा एक दारुण पराभव लादण्यासाठी आपले सर्वस्व झोकून देण्याची तयारी केली आहे.
डेल स्टेन, व्हर्नोन फिलेंडर व मॉर्नी मॉर्कल या पहिल्या पसंतीच्या तीन वेगवान गोलंदाजांच्या अनुुपस्थितीनंतरही कगिसो रबाडा, दुआने ऑलिव्हर, आंदिले फेलुकवायो हे जलदगती त्रिकुट व केशव महाराजच्या रुपाने ‘खडूस’ फिरकीपटू दक्षिण आफ्रिकेचे काम फत्ते करण्यासाठी पुरेसा आहे. परंतु, मॉर्कलच्या जागी वेन पार्नेलच्या रुपात अष्टपैलू किंवा डॅन पॅटरसनच्या रुपात तज्ज्ञ वेगवान गोलंदाज ‘अंतिम ११’मध्ये खेळणार असल्याने इतर गोलंदाजांच्या खांद्यावरील भार हलका होणार आहे. पहिल्या कसोटीपेक्षा दुसर्या कसोटीसाठीची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक सहाय्य करण्याची शक्यता आहे. यानंतरही बांगलादेशचा संघ चार वेगवान गोलंदाजांसह उतरण्याची शक्यता नसून पहिल्या कसोटीत दोनशेपेक्षा जास्त धावा मोजून एकही बळी मिळविण्यात अपयशी ठरलेला ऑफस्पिनर मेहदी हसन आपली संघातील जागा राखू शकतो. दिशाहीन ठरलेला वेगवान गोलंदाज तस्किन अहमदऐवजी सुभाशिष रॉयला संधी मिळू शकते.
द. आफ्रिका (संभाव्य) ः डीन एल्गार, एडन मारक्रम, हाशिम आमला, तेंबा बवुमा, फाफ ड्युप्लेसिस, क्विंटन डी कॉक, आंदिले फेलुकवायो, केशव महाराज, कगिसो रबाडा व दुआने ऑलिव्हर.
बांगलादेश (संभाव्य) ः ईमरूल काईस, सौम्य सरकार, मोमिनूल हक, महमुदुल्ला, मुश्फिकुर रहीम, सब्बीर रहमान, लिट्टन दास, मेहदी हसन, शफिउल इस्लाम, मुस्तफिझुर रहमान व सुभाशिष रॉय.
सामन्याची वेळ ः दुपारी १.३०