पणजी महापालिकेच्या महापौर व उपमहापौरांची आज निवड होणार असून महापौरपदी भाजप समर्थक नगरसेविका वैदेही नाईक यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता महापालिका सूत्रांनी व्यक्त केली.
टोनी रॉड्रिग्ज हे ऐनवेळी आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. तसे झाल्यास महापौरपदी बिनविरोध निवड होण्याचा वैदेही नाईक यांचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, टोनी रॉड्रिग्ज यांनी उपमहापौरपदासाठीही अर्ज केलेला असून महापौरपदासाठीच्या निवडणुकीतून माघार घेतल्यास त्यांना उपमहापौरपदी निवडून आणण्याचे आश्वासन भाजप गोटातून मिळाले असल्याचे समजते.
या पार्श्वभूमीवर वैदेही नाईक यांची महापौर व टोनी रॉड्रिग्ज यांची उपमहापौरपदी निवड निश्चित असल्याचे मानले जात आहे. टोनी रॉड्रिग्ज यांनी यापूर्वी महापौर म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. तर वैदेही नाईक यांना पहिल्यांदाच महापौर होण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.