Home Featured राज्यात 2 महिन्यांसाठी मासेमारीवर बंदी

राज्यात 2 महिन्यांसाठी मासेमारीवर बंदी

0

>> मत्स्यखवय्यांची मात्र होणार गैरसोय; खारीवाडा, कुटबण, मालिमसह सर्व जेटींवर पसरला शुकशुकाट; परप्रांतीय कामगार माघारी परतले

राज्यात काल मध्यरात्रीपासून पुढील दोन महिन्यांसाठी मासेमारी बंदी लागू झाली असून, मान्सून काळात सागरी जैवसंपत्तीचे संरक्षण आणि माशांच्या प्रजनन प्रक्रियेला चालना देण्यासाठी ही बंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभमीवर खारीवाडा-वास्को जेटी, कुटबण जेटी, मालिम जेटी, आगशी जेटी यासह अनेक मच्छिमारी जेटींवर काल संध्याकाळी उशिरापर्यंत मच्छिमारांकडून जाळी व अन्य सामानाच्या आवराआवरीचे काम सुरू होते. मासेमारी बंदी लागू झाल्याने मत्स्यखवय्यांची मात्र थोडी गैरसोय होणार आहे. बंदी काळात अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग, किनारी पोलीस आणि संबंधित यंत्रणा विशेष गस्त ठेवणार आहे.
मान्सून हंगामात लागू होणाऱ्या या बंदीमुळे माशांच्या प्रजननाला पोषक वातावरण मिळते आणि सागरी पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. या काळात यांत्रिक मासेमारी नौकांना समुद्रात जाण्यास बंदी असते. मात्र पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या काही स्थानिक मच्छिमारांना नियमानुसार सवलत दिली जाते.

बंदीच्या काळात मच्छिमार बांधवांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ नये यासाठी सरकार विविध कल्याणकारी योजना आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देते. सागरी संपत्तीचे संवर्धन आणि भविष्यातील मासेमारी उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याने आगामी दोन महिन्यांत किनारपट्टी भागात विशेष देखरेख ठेवण्यात येणार असून, बेकायदेशीर मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क राहणार असल्याची माहिती मत्स्योद्योग विभागाने दिली आहे.
मासेमारीविषयक कायद्यांची राज्य सरकारकडून कठोर अंमलबजावणी केली जात असून, यंदा अनेक बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटी पकडण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशाराही मत्स्योत्योग विभागाने दिला आहे.

जेटींवर आवराआवर सुरू
पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर खारीवाडा येथील बोटमालकांनी आपल्या कामगारांना बोटीवरील साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी कामाला लावल्याचे चित्र काल पाहायला मिळाले. त्यानुसार कामगारांकडून जाळी गुंडाळून ती सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रकमध्ये चढवण्याचे काम सुरू असल्याचे चित्र खारीवाडा जेटीवर दिसून आले.

परप्रांतीय कामगारांनी धरली गावाची वाट
तसेच अनेक परप्रांतीय कामगार आपल्या मूळगावी यापूर्वीच परतले असल्याचे सांगण्यात आले. काही कामगार आपले सामान बांधून मूळ गावी जाण्यासाठी तयारीत आहेत. दररोज गजबजलेल्या खारीवाडा जेटीवर काल शांतता पसरली होती. अनेक परप्रांतीय कामगार पावसाळ्यात आपापल्या मूळ गावी शेतीकामात व्यस्त राहतात आणि साधारणपणे ऑगस्टच्या मध्यानंतरच जेट्टीवर परततात. गोव्याचा यांत्रिकीकृत मासेमारी उद्योग हा ओडिशा आणि झारखंड या राज्यांतील स्थलांतरित मजुरांवर पूर्णपणे अवलंबून आहे.