Home Featured विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबतयुतीसाठी गोवा फॉरवर्ड तयार : सरदेसाई

विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबतयुतीसाठी गोवा फॉरवर्ड तयार : सरदेसाई

0

2022 च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोवा फॉरवर्ड पक्षाने काँग्रेसबरोबर युती केली होती. आताही आम्ही काँग्रेसबरोबर युती करण्यास तयार आहोत, असे गोवा फॉरवर्डचे प्रमुख तथा आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले असून, मतदारांना चांगला पर्याय उपलब्ध करून देऊन सत्ताधारी भाजपचा पराभव करणे हे आमचे ध्येय असल्याचे म्हटले आहे.

भाजपने निवडणुकीसाठीची तयारी सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्व विरोधी पक्षही सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना विजय सरदेसाई यांनी आपला गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेसबरोबर युतीसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत राज्यातील बेरोजगारी, पर्यावरण, पर्यटनविषयक प्रश्न, भू-रुपांतरे, भ्रष्टाचार, खाण उद्योग व पक्षांतरे हे महत्त्वाचे मुद्दे ठरणार असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसबरोबर आमची युती झाल्यास या युतीला मागच्यावेळी केलेल्या चुका सुधाराव्या लागतील, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. आम्ही आमचा पक्ष बळकट करण्याचे काम हाती घेतले असून, 10 गट मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. महिला व युवा विभागाला बळकटी देण्याचे काम लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी नमूद केले.

नवनियुक्त गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याविषयी बोलताना सरदेसाई म्हणाले की, 2022 साली झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीवेळी गिरीश चोडणकर हेच प्रदेश काँग्रेस अध्यक्ष होते. आणि तेव्हा त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाने युतीसाठी हिरवा कंदील दाखवला होता. आताही चोडणकर यांच्याबरोबरचे आपले संबंध हे चांगले असल्याचे सरदेसाई म्हणाले.