कर्नाटकातील सत्तानाट्याचा नवा अध्याय लवकरच लिहिला जाईल अशी चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. ते पद त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी डी. के. शिवकुमार यांना बहाल केले जाईल असे सध्याचे चित्र आहे. 2023 मध्ये जेव्हा काँग्रेसने कर्नाटकमध्ये सत्ता पटकावली, तेव्हा मुख्यमंत्रिपदाचे हे दोन्ही दावेदार पुढे झाले होते. मात्र, तेव्हा सिद्धरामय्या यांनी बाजी मारली आणि शिवकुमार यांना अडीच वर्षांनी मुख्यमंत्रिपद देण्याच्या आश्वासनावर शांत करण्यात आले. आता अडीच वर्षांनी शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आकांक्षेला पुन्हा धुमारे फुटले तर नवल नाही. पक्षासाठी शिवकुमार ह्यांचे योगदान खूप महत्त्वाचे राहिले आहे. संकटमोचक अशीच त्यांची प्रतिमा आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा शिवकुमार हेच त्या आमदारांना आपल्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवत आले. त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागले. केंद्रीय यंत्रणांनी त्यांच्यामागे ससेमिरा लावला. परंतु त्या सर्वांना ते आजवर पुरून उरले आहेत. सिद्धरामय्या हेही काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. कर्नाटकातील काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचा त्यांना भक्कम पाठिंबा राहिला आहे. शिवकुमार ह्यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींची जरी पसंती असली, तरी सिद्धरामय्या कर्नाटकच्या राजकारणावरील आपले वर्चस्व सहजासहजी सोडून द्यायला तयार नाहीत. त्यामुळे पक्षाने त्यांचे मुख्यमंत्रिपद काढून घेताना त्यांचा पुरेपूर मान राखला जाईल अशा प्रकारचे प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवले आहेत. सिद्धरामय्या यांना राज्यसभेची जागा दिली जाईल आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान दिले जाईल असे आश्वासन पक्षाच्या हायकमांडने त्यांना दिलेले आहे. त्याच बरोबर कर्नाटक सरकारमधील त्यांचे वजन कमी होऊ नये ह्यासाठी उपमुख्यमंत्रिपदावर त्यांच्या समर्थकांची वर्णी लावण्यात येणार आहे. त्यासाठी एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या यांचे समर्थक बसवले जाऊ शकतात. खुद्द सिद्धरामय्या यांचा मुलगा यतींद्र यालाही कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे घाटत आहे. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवताना त्यांना यत्किंचतही दुखविण्याची काँग्रेस पक्षश्रेष्ठींची तयारी नाही. सिद्धरामय्या हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तर आहेतच, शिवाय ते इतर मागासवर्गीय नेते असल्याने त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचे गंभीर परिणाम काँग्रेसच्या समर्थकांवर होऊ शकतात. सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रिपद सोडायची तयारी आहे, परंतु त्यांच्या काही मागण्याही दिसतात. स्वतःच्या राजकीय पुनर्वसनाबरोबरच समर्थकांना कर्नाटकची उपमुख्यमंत्रिपदे व कॅबिनेट मंत्रिपदेच नव्हे, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदीही आपल्या समर्थकाची वर्णी लागावी अशी त्यांची इच्छा आहे. ह्या तिढ्यातून वाट काढण्यासाठी काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सूरजेवाला आज बंगळुरूत दाखल होणार आहेत. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात सत्तासंघर्ष जरूर आहे, परंतु दोन्ही नेत्यांनी तो आजवर संयमाच्या चौकटीत ठेवला आहे. शिवकुमार यांचा अलीकडेच साजरा झालेला वाढदिवस आणि त्यानिमित्त कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख असलेला केक चर्चेचा विषय ठरला होता. गेल्या डिसेंबरपासून शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळावे ह्यासाठी प्रयत्न चालवले होते. त्यासंदर्भात सिद्धरामय्या यांच्याशी त्यांच्या एक दोन बैठकाही झाल्या होत्या. आपल्याला आता मुख्यमंत्रिपद मिळाले तर पुढील निवडणूक येईपर्यंतच्या काळात आपण आपल्या कामाची छाप दाखवू शकू असे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. याउलट आता मुख्यमंत्रिपद आपल्याकडून काढून घेतल्याने राज्याच्या प्रशासनाचा सध्याचा वेग मंदावेल अशी भीती सिद्धरामय्या पक्षश्रेष्ठींना घालत आहेत. परंतु शिवकुमार यांची मागणी न्याय्य आहे असे श्रेष्ठींना वाटते. कर्नाटकची सत्ता हाती आली तेव्हा त्यांनी त्या पदावरील हक्क विनातक्रार सोडला त्याची बक्षिसी त्यांच्या पदरात पडली पाहिजे असे पक्षश्रेष्ठींना वाटते. मात्र, ह्या प्रकरणात मुख्यमंत्रिपदासाठी खुद्द काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नावही अचानक पुढे आलेले आहे. त्यांच्यासारख्या दलित नेत्याकडे कर्नाटकची धुरा सोपवण्याने जनतेमध्ये उत्तम संदेश जाईल असे मानणाराही एक गट आहे. जो कोणी नवा मुख्यमंत्री असेल, त्याची पुढील साधी सोपी नसेल. कर्नाटकसारखे दक्षिणेतील महत्त्वाचे राज्य आपल्या हाती टिकवून ठेवणे हे काँग्रेसच्या अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सिद्धरामय्यांसारख्या ‘अहिंदा’ नेत्याचे पद शिवकुमारसारख्या ‘वोक्कळिगा’कडे दिले तर निवडणुकीत फटका बसेल ही भीतीही आहे. त्यामुळे काहीही करून हे सत्तांतर सुरळीतपणे व्हावे ह्यासाठी काँग्रेस पक्षाची सध्याची धडपड दिसते.