Home Featured बर्च प्रकरणात ईडीकडून11 कोटींची मालमत्ता जप्त

बर्च प्रकरणात ईडीकडून11 कोटींची मालमत्ता जप्त

0

ईडीच्या पणजी विभागीय कार्यालयाची कारवाई

आतापर्यंत ईडीकडून 29 कोटींची मालमत्ता जप्त

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पणजी येथील विभागीय कार्यालयाने हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील अग्नितांडव प्रकरणात आणखी 11.01 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली असून, आत्तापर्यंत एकूण जप्ती 29 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

ईडीच्या पणजी विभागीय कार्यालयाकडून बर्च अग्नितांडव प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002 अंतर्गत चौकशी केली जात आहे. गेल्या 6 डिसेंबर 2025 रोजी बर्च या नाईटक्लबला लागलेल्या आगीत 25 जणांचा बळी गेला होता.
या नाईटक्लबला मंजुरी मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे उघड झाले होते. ह्या नाईटक्लबकडे अग्निशामक दलाचा परवाना नव्हता. तसेच, मार्च 2024 मध्ये व्यापार परवान्याची मुदत पूर्ण झाली तरी देखील व्यवसाय सुरू ठेवला होता. या आस्थापनाने आर्थिक वर्ष 2023-24 ते 6 डिसेंबर 2025 या कालावधीत अंदाजे 29.78 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. सदर महसूल पीएमएलए अंतर्गत गुन्हेगारीतून मिळालेला महसूल आहे, असे ईडीने
म्हटले आहे.

यापूर्वी या प्रकरणात 23 जानेवारी 2026 रोजी विविध ठिकाणांवर केलेल्या छाप्यांमध्ये गुन्हेगारी स्वरूपाची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली होती आणि सुमारे 59 लाख रुपयांची बँक खाती गोठवण्यात आली होती. या प्रकरणात यापूर्वी 17.45 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्याचा आदेशही जारी करण्यात आला होता, असेही ईडीने म्हटले आहे.