मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नवी दिल्लीत सेवा तीर्थवर सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे वडील पांडुरंग सावंत, पत्नी सुलक्षणा सावंत आणि कन्या पार्थिवी सावंत ही हजर होती.
या भेटीसंबंधी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे म्हणाले की, कालचा दिवस हा माझे वडील पांडुरंग सावंत यांच्यासाठी विशेष होता. त्यांनी आपल्या समाजसेवेचे कार्य हे जनसंघापासून सुरू केले होते. त्यामुळे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन घेतलेली भेट ही त्यांच्यासाठी संस्मरणीय ठरल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
याशिवाय काल मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय बंदर, जहाजोद्योग व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी गोव्यातील सागरी पायाभूत सुविधा व जलवाहतुकीविषयी चर्चा केली. यावेळी किनारपट्टी विकासाचाही फेरआढावा घेण्यात आला.
अमित शहांसोबतही निवडणुकीविषयी चर्चा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली. या भेटीत आपण शहा यांच्याशी गोव्याचा विकास व प्रगती यासंबंधीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्याशिवाय या भेटीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी 2027 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयीही चर्चा केली.