पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच देशांचा ताजा दौरा प्रत्यक्षातील महत्त्वपूर्ण बोलणी आणि करारमदार यांच्यापेक्षा किरकोळ आनुषंगिक बाबींमुळेच सध्या अधिक चर्चेत असल्याचे दिसते. मोदींच्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय दौऱ्यावेळी असेच घडत आले आहे. त्यामुळे भारताची प्रगती झोंबणाऱ्या काही शक्ती जाणूनबुजून ही नकारात्मकता पसरवीत आहेत का आणि त्यांची तळी आपल्याकडील विरोधी पक्ष उचलत आहेत का असा प्रश्न पडतो. इराण – अमेरिका युद्धाने जरा उसंत घेतली आणि पंतप्रधान मोदींचा हा पाच राष्ट्रांचा पूर्वनियोजित दौरा संयुक्त अरब अमिरातीपासून सुरू झाला. संयुक्त अरब अमिरात भारतात पाच अब्ज डॉलरची नवी गुंतवणूक करण्यास राजी झाला आहे, शिवाय संरक्षण सहकार्य आणि भारतासाठी तेलाच्या विशेष साठवणुकीसंबंधीही उभय देशांत बोलणी झाली. तेथून पंतप्रधान नेदरलँडला गेले. सेमी कंडक्टरच्या निर्मितीसाठी भारताचे जे प्रयत्न चालले आहेत, त्यामध्ये नेदरलँडची साथ राहिली आहे. त्यामुळे तेथे त्यासंदर्भात करारमदार झाले, तंत्रज्ञान सहकार्याचे वायदे झाले. हवामानविषयक संसाधनांचा पुरवठा आणि या क्षेत्रातील तंत्रज्ञानाची मदत भारताला देण्याची तयारी नेदरलँडने दर्शवली. तेथून मोदींचा मुक्काम नॉर्वेत झाला. खरे तर त्या देशाला भेट देणारे मोदी हे गेल्या 43 वर्षांतील पहिले भारतीय पंतप्रधान होते. यापूर्वी इंदिरा गांधी 83 साली तेथे गेल्या होत्या. नॉर्वे आणि त्याचे सोबती असलेले स्वीडन, फिनलंड, आइसलँड आणि डेन्मार्क हे देश ‘नॉर्डिक देश’ म्हणून संबोधले जातात. ह्या देशांचे हरित ऊर्जा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे काम आहे. त्यामुळे हरित ऊर्जा तंत्रज्ञान, त्याची कृत्रिम प्रज्ञेशी सांगड आदींसंदर्भात ह्यावेळी करारमदार झाले. शेवटी मोदी इटलीत दाखल झाले. इटली हा अवजड यंत्रसामुग्री निर्मितीसाठी ज्ञात देश आहे. त्यासंदर्भात तसेच संरक्षण सहकार्य, हरित ऊर्जा आदींसंदर्भात तेथेही करारमदार झाले. हे सगळे एवढे सकारात्मक घडत असताना प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा राहिली, ती मात्र या दौऱ्यादरम्यान घडलेल्या काही किरकोळ घटनांबाबत. नॉर्वेमध्ये तेथील पंतप्रधान योनास स्टोरे आणि पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त निवेदन जारी केले. आधी नॉर्वेचे पंतप्रधान बोलले व नंतर मोदींनी विचार मांडले. हे त्रोटक निवेदन करून मोदी परत चालले असता हेला लेंग नामक एका तरुण महिला पत्रकाराने मोदींना उद्देशून ‘जगातील सर्वांत मुक्त प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देणार का?’ असा सवाल केला. पंतप्रधान निवेदन आटोपून परत चालले असताना आलेला हा प्रश्न त्यांच्या कानी गेला की नाही ह्याचीही खात्री नाही. परंतु तरीही भारतात काँग्रेस पक्षाने हा मुद्दा उचलून धरला आणि पंतप्रधान उत्तर न देता पळाले असा अपप्रचार चालवला आहे. भारतीय दूतावासाने नंतर सदर महिला पत्रकाराला प्रत्यक्ष पत्रकार परिषदेस हजर राहण्याचे जाहीर निमंत्रण दिले व विदेश सचिव तिच्या प्रश्नाला सामोरेही गेले. परंतु त्यांचे उत्तर पूर्ण न ऐकताच ती त्यांच्या बोलण्यात अडथळे आणत प्रतिप्रश्न विचारीत राहिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा कार्यक्रमांचा एक शिष्टाचार असतो. येथे तो पाळला गेलेला दिसला नाही. परंतु काँग्रेस पक्षाने त्याचे भांडवल चालवले आहे. मोदींनी इटलीला भेट दिली तेव्हा तेथील पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना पार्ले मेलडीज टॉफींचे पाकीट भेट दिले. सामान्य शिष्टाचाराचा आणि त्यातही पुन्हा भारतीय उत्पादनांना जागतिक स्तरावर प्रस्तुत करण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांचा तो एक भाग आहे एवढीही समज राहुल गांधी यांना दिसत नाही. देश आर्थिक संकटात असताना मोदी इटलीत टॉफी वाटत आहेत असा सूर त्यांनी लावला आहे. भारतीय पंतप्रधान आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असताना त्यासंदर्भात दाखवली जाणारी ही नकारात्मकता खेदजनक आहे. राहुल यांनी हे काही पहिल्यांदा केलेले नाही. पंतप्रधान मोदींना टीकेचे लक्ष्य करण्याच्या नादात भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सतत होत आले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्याच देशाला मान खाली घालायला लावणारी व्याख्याने झोडली आहेत. देशाचा पंतप्रधान जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जात असतो, तेव्हा तो केवळ सत्ताधाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून जात नसतो, तर संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व तो तेथे करीत असतो. तेथे आपल्या देशाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये हेच स्पष्टपणे सांगितले. पवारांसारख्या जुन्या जाणत्या नेत्याला जो शिष्टाचार ठाऊक आहे, तो राहुल यांना भारतीय राजकारणात एवढी वर्षे घालवूनही अद्यापही नसावा? त्यांनी आपले राजकीय मतभेद देशात जरूर दाखवावेत, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंतप्रधानांची मानहानी ही देशाची मानहानी असते ही समज त्यांना येईल तो सुदिन.