Home Featured लुथरा बंधूंच्या जामिनालाउच्च न्यायालयात आव्हान

लुथरा बंधूंच्या जामिनालाउच्च न्यायालयात आव्हान

0

राज्य सरकारकडून याचिका दाखल; नोटीस जारी; 15 जूनला होणार सुनावणी

हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईटक्लबमधील भीषण अग्नितांडव प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी क्लबचे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा, तसेच सहमालक अजय गुप्ता यांच्या जामिनाला राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर, गोवा खंडपीठाने संशयितांना नोटीस जारी केली असून, या आव्हान याचिकेवर दि. 15 जून रोजी सुनावणी घेतली जाणार आहे.

गेल्या 6 डिसेंबर 2025 रोजी बर्च या नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा बळी गेला होता. या प्रकरणात हणजूण पोलिसांनी क्लबचे मालक, सहमालक, क्लबचे अधिकारी अशा अनेकांच्याविरोधात गुन्हा दाखल करून आरोपपत्र म्हापसा येथील न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणामध्ये क्लबचे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा, सहमालक अजय गुप्ता याना म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
बर्च अग्नितांडव प्रकरण हे संवेदनशील, गंभीर स्वरूपाचे असून, त्यात 25 जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी क्लबचे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा, सहमालक अजय गुप्ता यांना जामीन मंजूर करणे योग्य नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

गोवा खंडपीठाने या आव्हान याचिकेला अनुसरून संशयित आरोपी लुथरा बंधू आणि अजय गुप्ता यांना नोटीस जारी केली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जून 2026 रोजी घेतली जाणार आहे.
बर्च अग्नितांडवाची घटना घडल्यानंतर लुथरा बंधूंनी थायलंडला पलायन केले होते. मात्र थायलंड पोलिसांच्या मदतीने त्यांचे भारतात यशस्वी प्रत्यार्पण करण्यात आले होते. यानंतर त्या दोघांना गोव्यात आणून रितसर अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती आणि आरोपपत्र देखील करण्यात आले होते. यानंतर बर्च अग्नितांडवाचे मूळ प्रकरण आणि आरोग्य केंद्राचा बनावट दाखला या दोन्ही प्रकरणांत लुथरा बंधू आणि अजय गुप्ता याला जामीन मिळाला होता.