Home Featured बेदर‘कार’चालकाला अटक

बेदर‘कार’चालकाला अटक

0

दोनापावल सर्कलजवळ भरधाव वेगाने 3 वाहनांना धडक

दोनापावल सर्कल येथे मंगळवारी रात्री एका भरधाव बीएमडब्लू कारने तीन वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात कुणीही गंभीर जखमी झालेला नसला तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले. मद्याच्या नशेत बीएमडब्लू कार बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे चालवून तीन वाहनांना धडक दिल्या प्रकरणात कारचालक जगदीश सरदेसाई (27 वर्षे, रा. दोनापावल) याला पणजी पोलिसांनी काल अटक केली. या अपघातानंतर जगदीश सरदेसाई याने तेथे जमलेल्या नागरिकांशी गैरवर्तन केल्याची तक्रार आहे.

संशयित आरोपी जगदीश सरदेसाई याने मद्याच्या नशेत असताना जीए-07-पी-3591 या नोंदणी क्रमांकाची आपली बीएमडब्ल्यू कार बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे चालवून तीन वाहनांना धडक दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात नुकसान झालेल्या वाहनांमध्ये महिंद्रा ईव्ही एक्सईव्ही 9एस (जीए-07-पी-6845), स्कोडा रॅपिड (जीए-07-एल-8999) आणि महिंद्रा थार (जीए-07-सी-3577) या तीन वाहनांचा समावेश आहे.
या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच अपघातानंतर बीएमडब्लूचा चालक जगदीश याने इतर वाहनचालकांशी असभ्य वर्तन केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. नागरिकांनी कारचालक जगदीश याला जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना फोन करून अपघाताची
माहिती दिली.

पणजी पोलिसांनी या प्रकरणात दोनापावल येथील रहिवासी जगदीश सरदेसाई याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), 2023 च्या कलम 281 आणि 125, तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अन्वये गुन्हा क्र. 62/2026 दाखल केला आहे.

रात्रीच्या वेळी दोनापावल ते बांबोळी या मार्गावर काही जणांकडून सर्रास भरधाव कार चालविल्या जातात. या मार्गावर मणिपाल हॉस्पिटलजवळ मार्च महिन्यात एका भरधाव अलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका युवतीचे निधन झाले होते.

या अपघात प्रकरणातील संशयित जगदीश याने यापूर्वी जानेवारी महिन्यात दोनापावल येथे बेशिस्तपणे कार चालवून एक अपघात केल्याची तक्रार एका महिलेने पणजी पोलीस स्थानकात दाखल केली होती. तथापि, या अपघात प्रकरणात तिला न्याय मिळाला नाही, असा दावा महिलेने केला आहे.