केतन भाटीकर यांच्यासारख्या उमद्या कार्यकर्त्याच्या अत्यंत अतर्क्य प्रकारे झालेल्या आकस्मिक मृत्यूच्या वार्तेने कालची सकाळ काळवंडली. खरे तर ते कधी आमदार बनू शकले नाहीत. मंत्री तर नाहीच नाही. आमदारकीचे स्वप्न पाहून त्यासाठी प्रखर झुंज मात्र दिली. परंतु आपल्या अविरत, अहोरात्र चाललेल्या सामाजिक कार्याने त्यांनी आमदार आणि मंत्र्यांनाही दुर्लभ असे जनतेचे प्रेम आणि पाठबळ प्राप्त केले होते. कोणत्याही क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीने ठाम ठरवले, तर प्रस्थापित राजकीय व्यवस्थेपुढे केवळ आपल्या कार्याच्या बळावर ती व्यक्ती आव्हान उभे करू शकते हे केतन भाटीकर यांनी दाखवून दिले होते. राजकीय गॉडफादरच्या आणि पक्षाच्या पाठबळावर दगडधोंडे देखील आमदार म्हणून निवडून आलेले गोव्याने अनेकदा पाहिले. परंतु पक्षाबिक्षाच्या कुबड्या न घेता स्वतःच्या हिंमतीवर राजकीय क्षितिजावर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये केतन भाटीकर यांची गणना करावी लागेल. अशा उमद्या व्यक्तीच्या आशाआकांक्षांचा चुराडा करीत मृत्यूने ज्या प्रकारे त्यांच्यावर अपरात्री घाला घातला तो क्रौर्याचा कळसच म्हणावा लागेल.
‘कमसे कम मौत से
ऐसी मुझे उम्मीद नही
जिंदगी तू ने तो
धोके पे दिया है धोका’
असेच अनुभव केतन भाटीकर यांना व्यक्तिगत आयुष्यात सतत आले. त्यांच्या राजकीय आयुष्यातही दुर्दैवाने त्यांची पाठ काही सोडली नाही. हातातोंडाशी आलेला विजय नियतीने त्यांच्या तोंडून एकदा नव्हे, दोनदा हिरावून घेतला. 2022 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये फोंड्यामध्ये अत्यंत चुरशीच्या तिरंगी लढतीत रवी नाईक यांना त्यांनी जवळजवळ पराभूतच केले होते. रवींच्या सुदैवाने अवघ्या 77 मतांच्या फरकाने केतन ती निवडणूक हरले. दोघांची मते पाहिली, तर भाजपची सर्व यंत्रणा आणि स्वतःची वैयक्तिक पुण्याई पाठीशी असलेल्या रवींना 7514 मते, तर मगोच्या नावे, परंतु केवळ स्वतःच्या कामाच्या बळावर केतन यांनी 7437 मते मिळवून तगडी झुंज दिली होती. भंडारी समाजाच्या एका बलाढ्य नेत्याचा सामना भाटीकरांनी केला होता हेही येथे लक्षात घ्यायला हवे. फेरमोजणीत अवघ्या 77 मतांच्या फरकाने केतन यांची आमदारकी हुकली. दोघांच्या मतांच्या टक्केवारीचा फरक तर जेमतेम 0.4 टक्क्यांचा होता. रवींना 29.05 टक्के मते मिळाली होती, तर केतन यांना 29.01. रवींच्या निधनानंतर केतन यांना दुसऱ्यांदा आमदारकीची संधी चालून आली होती. ह्यावेळी ते काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते, परंतु आपल्या आजवरच्या कार्याच्या बळावर रवी नाईकांसारख्या धुरंधर दिवंगत नेत्याच्या मुलापुढे – तो सत्ताधारी पक्षातर्फे निवडणूक लढवत असूनही त्यांनी जबरदस्त आव्हान उभे केले. फोंड्याच्या पोटनिवडणुकीतील त्यांचा विजय जवळजवळ निश्चित वाटत होता. असे असताना किंवा बहुधा त्यामुळेच, लोकप्रतिनिधी कायद्यातील निर्वाचित सदस्याच्या कार्यकाळाचा मुद्दा उशिरा डोक्यात आलेल्या निवडणूक आयोगाने आधल्या दिवशी ती पोटनिवडणूकच रद्द करून टाकली. एकदा सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया सहसा रद्द केली जात नाही हा आजवरचा पायंडा पायदळी तुडवून निवडणूक आयोगाने घेतलेल्या ह्या निर्णयाला केतन यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु त्याची सुनावणी ज्या दिवशी होणार होती, तो दिवस पाहणेही त्यांच्या नशिबी नव्हते. ज्या प्रकारे त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला तो तर अजबच प्रकार आहे. दांडेलीला गेलेले केतन अपरात्री अनमोड घाटात लघवीसाठी गाडी थांबवून उतरतात काय, त्यांचा मोबाईल खाली पडतो काय आणि त्याचवेळी मोका साधून एक साप त्यांना दंश करतो काय! अनेक शक्यता एकाचवेळी प्रत्यक्षात उतरतात तेव्हाच असे काही अतर्क्य घडते. राजा परीक्षिताला तक्षकाने बोरातून प्रकटून दंश केला होता ती कथा आठवावी अशी ही विचित्र घटना आहे. परीक्षिताने तरी शमिक ऋषींच्या गळ्यात मेलेला हार टाकून त्यांच्या मुलाचा – शृंगीचा कोप ओढवून घेतला होता. येथे केतन यांनी काय केले होते? समाजाच्या सेवेसाठी ते अहोरात्र तत्पर होते. अडल्या नडल्यांच्या मदतीला धावत होते. अशा धडपड्या, उमद्या सामाजिक कार्यकर्त्याचा वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी अशा प्रकारे मृत्यू ओढवावा हे न पटणारे आहे. ‘रायझिंग फोंडा’च्या माध्यमातून सामाजिक कार्याचा आदर्श उभा करणाऱ्या ह्या ‘रायझिंग स्टार’चा हा असा मृत्यूू त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सामाजिक, राजकीय क्षेत्रात पुढे येऊ पाहणाऱ्या अनेकांच्या आकांक्षांचे आभाळही काळवंडून गेला आहे. पण मृत्यू हा नश्वरतेकडून अमरत्वाकडे जातानाचा केवळ एक थांबा असतो असे भारतीय धर्मशास्त्र सांगते. त्यांच्या आजवरच्या कार्याने केतन भाटीकर लोकांच्या आठवणींत नक्कीच अमर झाले आहेत!