
>> हेराथ, दिलरुवानच्या मार्यासमोर पाकिस्तानची शरणागती
रंगना हेराथच्या दुसर्या डावातील ४३ धावांतील ६ बळींच्या जोरावर श्रीलंकेने नाट्यमय कलाटणी मिळालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा २१ धावांनी पराभव केला. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या १३६ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ११४ धावांत संपला. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्राअखेरपर्यंत विजय दृष्टिपथात असताना पाकिस्तानला हेराथच्या फिरकीने पराभवाचा डोस पाजला.
चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेचा संघ दुसर्या डावात ४ बाद ६९ असा चाचपडत होता. पाचव्या दिवशीदेखील लंकेची स्थिती सुधारली नाही. परंतु, निरोशन डिकवेला याने नाबाद ४० धावा करतानाच तळातील फलंदाजांसह केलेल्या लहान मोठ्या भागीदार्या लंकेच्या कामी आल्या. लंकेने दुसर्या डावात १३८ धावा करत पाकसमोर विजयासाठी १३६ धावांचे लक्ष्य ठेवले. पाकचा संघ हे लक्ष्य गाठून मालिकेत आघाडी घेईल अशी अपेक्षा असताना हेराथ व दिलरुवान परेरा (४६-३) यांनी पाकिस्तानवर अनपेक्षित पराभव लादला. पाकतर्फे असद शफिकने २० व हॅरिस सोहेलने ३४ धावा करत लंकेच्या गोलंदाजांचा थोडाफार प्रतिकार केला. त्यांचे ८ फलंदाज दुहेरी धावसंख्यादेखील करू शकले नाहीत. मालिकेतील दुसरा कसोटी सामना ६ ऑक्टोबरपासून दुबई येथे खेळविला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका पहिला डाव ः सर्वबाद ४१९, पाकिस्तान पहिला डाव ः सर्वबाद ४२२, श्रीलंका दुसरा डाव ः सर्वबाद १३८.
पाकिस्तान दुसरा डाव ः मसूद झे. सिल्वा गो. परेरा ७, अस्लम झे. करुणारत्ने गो. हेराथ २, अझर झे. डिकवेला गो. लकमल ०, शफिक झे. करुणारत्ने गो. हेराथ २०, बाबर झे. डिकवेला गो. परेरा ३, सोहेल पायचीत गो. परेरा ३४, सर्फराज यष्टिचीत डिकवेला गो. हेराथ १९, हसन त्रि. गो. हेराथ ८, आमिर त्रि. गो. हेराथ ९, यासिर नाबाद ६, अब्बास पायचीत गो. हेराथ ०, अवांतर ६, एकूण ४७.४ षटकांत सर्वबाद ११४.
गोलंदाजी ः लकमल १२-१, हेराथ ४३-६, परेरा ४६-३, प्रदीप ४-०, संदाकन ४-०.
४०० बळींचा मनसबदार
श्रीलंकेचा डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथने काल कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळींचा टप्पा ओलांडला. कसोटीत ४०० किंवा जास्त बळी घेणारा तो जगातील पहिलाच डावखुरा फिरकीपटू ठरला. आपल्या ८४व्या कसोटीत त्याने ही मजल मारली. केवळ मुथय्या मुरलीधरन (७२), रिचर्ड हेडली (८०) व डेल स्टेन (८०) यांनी हेराथपेक्षा कमी सामन्यांत ४०० धावांचा टप्पा ओलांडला होता. ३९ वर्षे १९७ दिवस वय असलेल्या हेराथने रिचर्ड हेडली यांचा (३८ वर्षे, २१४ दिवस) विक्रम मोडत अशी कामगिरी करणारा सर्वांत वयस्क खेळाडू होण्याचा मान मिळविला. ३०० ते ४०० बळींचा प्रवास तर हेराथने केवळ १५ कसोटींत पूर्ण केला. पहिल्या शंभर बळींसाठी हेराथने २९, दुसर्यासाठी १८ व तिसर्यासाठी २२ सामने खेळावे लागले होते. पाकिस्तानविरुद्ध बळींचे शतक करणारा जगातील पहिला गोलंदाज म्हणून त्याने रेकॉर्डबुकात आपले नाव नोंदविले. भारताच्या कपिलदेव यांच्या ९९ बळींना त्याने मागे टाकले. हेराथच्या नावावर आता पाकविरुद्ध कसोटींत १०१ बळींची नोंद झाली आहे.