राज्य सरकारच्या वाहतूक खात्याने दोनापावल पणजी येथील मिनी कूपर आणि मोटरसायकल अपघात प्रकरणात वेर्णा येथील बवारिया मोटर्स प्रा. लिमिटेड या वाहन विक्री करणाऱ्या आस्थापनेचा व्यापार परवाना 90 दिवसांसाठी निलंबित केला आहे. या अपघात प्रकरणात सुदीप ताम्हणकर यांनी वाहतूक खात्याकडे तक्रार दाखल केली होती. गेल्या एप्रिल महिन्यात विनानोंदणी मिनी कूपर कार रस्त्यावर आणण्यात आली होती. त्या कारने एका दुचाकीला धडक दिल्याने एका 23 वर्षीय युवतीचा मृत्यू झाला तर, दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. या मिनी कूपर कारला नोंदणी क्रमांक नव्हता. कुठल्याही प्रकारची नोंदणी नसताना दोनापावल-बांबोळी या महामार्गावर भरधाव वेगाने ही कार चालविली जात असताना मणिपाल इस्पितळाजवळ या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या प्रकरणात सुदीप ताम्हणकर यांनी बीएमडब्लू वाहनाचे अधिकृत वितरक असलेल्या बावारिया मोटर्सच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.