Home Featured सांतइनेज, दोनापावलामध्ये 2 कॉल सेंटरवर छापा

सांतइनेज, दोनापावलामध्ये 2 कॉल सेंटरवर छापा

0

19 संशयितांना अटक, 94 लाखांचा मुद्देमाल जप्त

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने सांतइनेज पणजी आणि दोनापावल या दोन ठिकाणी छापे घालून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 2 कॉल सेंटरचा पर्दाफाश काल केला असून एकूण 19 जणांना अटक केली आहे. संशयितांकडून सुमारे 94.7 लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. संशयित आरोपी अमेरिकी नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी कर्ज कंपनीचे एजंट असल्याचे भासवत होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

गुन्हा विभागाच्या पथकाने दोनापावल येथील एका व्हिलावर छापा घालून बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या बनावट कॉल सेंटर प्रकरणात 10 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 64.7 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. या छाप्यात आठ लॅपटॉप, लॅन राउटर उपकरणे, 11 मोबाईल फोन आणि तीन वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणात अटक केलेल्यामध्ये महिपालसिंह राठोड, रोहन चेट्टियार आणि असिम शेलत (सर्व गुजरात), शुभम देसाई (राजस्थान), शांतनु कर (पश्चिम बंगाल), संकल्प काणे, अक्षीत पाटील, सत्यम सिंग, बिजेश राणे आणि विलास उतेकर (सर्व महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.

सांतइनेज पणजी येथे एका इमारतीच्या एका फ्लॅटवर छापा घालून एका कॉल सेंटरचा पर्दाफाश केला असून 9 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 लॅपटॉप, 7 माऊस, 7 हेडफोन, 7 लॅपटॉप चार्जर, विविध कंपन्यांचे आणि मॉडेल्सचे 13 मोबाईल आणि एक कारगाडी असा 30 लाखांचा ऐवज जप्त केला.

या प्रकरणात संशयित म्हणून यश राजेश देसाई (अहमदाबाद गुजरात), करण माला (अहमदाबाद, गुजरात), मिहिर देसाई, सज्जन (संपूर्ण तपशील नाही), ऋषव चौबे (तेजपूर, आसाम), दिब्य ज्योती रावा (सोनितपूर आसाम), रुशित सुनील बाथम (अहमदाबाद, गुजरात), अमीर अली मोहम्मद (नवी दिल्ली), विश्वजित दत्तात्रेय सोनवणे (बडोदा, गुजरात) यांना अटक केली आहे.