Home Featured गौतम खट्टरविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

गौतम खट्टरविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

0

>> वास्को न्यायालयाचा आदेश; माधव खट्टरला 4 दिवसांची पोलीस कोठडी; गौतमचा शोध सुरू

सेंट फ्रान्सिस झेवियरविषयी आक्षेपार्ह विधान प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गौतम खट्टर याच्याविरोधात वास्को येथील न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काल जारी केले. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणात अटक केलेल्या गौतम खट्टर याचा भाऊ माधव खट्टर याला चार दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. तसेच गौतम खट्टर याचा अजूनपर्यंत थांगपत्ता लागू शकलेला नाही.

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेकडून गौतम खट्टर याचा देशातील विविध शहरांत कसून शोध घेतला जात आहे. मात्र तो अद्याप सापडू शकलेला नाही. आक्षेपार्ह विधानाच्या प्रकरणाला वाचा फुटण्यापूर्वी गौतम खट्टर याने गोव्यातून पलायन केले होते. त्याचा मुंबई, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि आसपासच्या भागात शोध घेतला जात आहे. तसेच तो देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून लुकआऊट नोटीस जारी केलेली आहे.

माधवला गोव्यात आणले
सेंट फ्रान्सिस झेवियरविषयी आक्षेपार्ह विधान प्रकरणात अटक केलेल्या माधव खट्टर याची कसून चौकशी केली जात आहे. गोवा पोलिसांनी माधवला हरिद्वार-उत्तराखंड येथे ताब्यात घेऊन गुरुवारी पहाटे गोव्यात आणले. त्यानंतर त्याला रितसर अटक करून वास्को येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी या आक्षेपार्ह विधान प्रकरणात कार्यक्रमाच्या आयोजकांची बुधवारी चौकशी करून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळविली होती. वास्को येथे कार्यक्रमाच्या आयोजकांकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली जात आहे. याशिवाय माधव याची कसून चौकशी सुरू आहे.

माविन गुदिन्होंना
मंत्रिपदावरून हटवा

सेंट फ्रान्सिस झेवियरबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या गौतम खट्टर याला तातडीने अटक करावी आणि माविन गुदिन्हो यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करीत ख्रिस्ती बांधवांनी मडगाव शहरात काल रात्री मेणबत्ती मोर्चा काढला. या दोन्ही मागण्या शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मान्य न झाल्यास गोवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला. या मोर्चात नागरिकांबरोबर गोवा फॉरवर्ड, काँग्रेस व इतर संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मडगाव येथील लोहिया मैदानावरुन या मेणबत्ती मोर्चाला सुरुवात झाली, तेथून नगरपालिकेच्या चौकात थांबून नागरिकांनी निषेध नोंदवला. त्यानंतर मोर्चा मडगाव येथील पोलीस मुख्यालयासमोर पोहोचला. तेथे गौतम खट्टर व मंत्री माविन गुदिन्हो यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वरील दोन्ही मागण्या शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मान्य कराव्यात, तसे न केल्यास गोवा सरकार या प्रकरणात सामील असल्याच्या संशयास वाव राहील. तसेच या प्रकरणात पोलिसांकडून ठोस माहिती मिळत नसल्याने संशय निर्माण झाला आहे, असे सरदेसाई म्हणाले. यापुढे मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार नाही, तर लोक रस्त्यावर उतरतील व त्याची सर्व जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा त्यांनी दिला.
या मोर्चात माजी मंत्री मिकी पाशेको, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुझे फिलिप डिसोझा, रामा काणकोणकर, प्रतिमा कुतिन्हो, वॉरन आलेमाव, मेशू डिकोस्ता, अँथनी डिसिल्वा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वास्को पोलीस स्थानकावर मोर्चा
सेंट फ्रान्सिस झेवियरबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टर याच्याविरोधात गोव्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील गौतम खट्टर आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी गुरुवारी शेकडो नागरिकांनी वास्को पोलीस स्थानकावर धडक मोर्चा काढला. यावेळी संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी केली. टिळक मैदानावर एकत्र जमलेल्या शेकडो नागरिकांनी मोर्चा काढत वास्को पोलीस स्थानक गाठले. माधव खट्टरची अटक ही केवळ धूळफेक असून मुख्य आरोपीला अटक झालीच पाहिजे, असा आग्रह धरत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक गुरुदास कदम यांनी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आल्याचे त्यांनी मोर्चेकऱ्यांना सांगितले. तसेच गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक उत्तराखंडमध्ये आधीच तैनात असून लवकरच आरोपीला अटक होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.