अफवांवर विश्वास नको; सरकारचे जनतेला आवाहन
गोव्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे स्थिर असून नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजीव गडकर यांनी दिली. पर्वरी येथे सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि घाबरून इंधन किंवा गॅस खरेदी न करण्याचे आवाहन केले.
राज्यात दररोज सुमारे 10,600 घरगुती एलपीजी सिलिंडरचे वितरण नियमितपणे सुरू असून पुरवठा सुरळीत आहे, असे तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. राज्य सरकारसोबत समन्वय साधून इंधन आणि एलपीजी उपलब्धतेवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
ग्राहकांना डिजिटल बुकिंगला प्रोत्साहन देण्यात येत असून एसएमएस, आयव्हीआरएस आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून सिलिंडर बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ओटीपी-आधारित प्रणालीद्वारे वितरणाची पारदर्शकता वाढविण्यात येत आहे.
स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थ्यांसाठी, ज्यांच्याकडे स्थानिक पत्त्याचा पुरावा नाही, त्यांना वैध ओळखपत्र आणि घोषणापत्राच्या आधारे 5 किलोचे फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडर वितरकांमार्फत उपलब्ध करून दिले जात आहेत. पाइपद्वारे नैसर्गिक वायू (पीएनजी) जोडणीही पर्याय म्हणून प्रोत्साहित केली जात असून पणजी, मडगाव आणि फोंडा येथे ही सुविधा उपलब्ध आहे.
साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी राज्यभरात आतापर्यंत 450 छापे टाकण्यात आले असून अनियमितता आढळलेल्या सर्व प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे. इंधन पुरवठ्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला पीआयबी गोव्याचे संचालक नाना मेश्राम, नागरी पुरवठा खात्याचे संचालक जयंत तारी, माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक अभिर हेदे तसेच हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते.
काळाबाजार रोखण्यास
आतापर्यंत 450 छापे
साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी राज्यभरात आतापर्यंत 450 छापे टाकण्यात आले असून अनियमितता आढळलेल्या सर्व प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे. इंधन पुरवठ्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.