Home बातम्या भीषण कार अपघातात आसगाव येथे दोघे ठार

भीषण कार अपघातात आसगाव येथे दोघे ठार

0
भीषण कार अपघातात आसगाव येथे दोघे ठार

सावतावाडा, आसगाव येथे काल रविवारी पहाटे साडेतीनच्या दरम्यान बर्थडे पार्टी आटोपून परतणार्‍या भरधाव कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कारची कुंपणाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघे ठार झाले तर दोघांची प्रकृती चिंताचनक आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांत एथॉन व्हिएगश (कारचालक) व लीएन रोचा यांचा समावेश आहे. जखमींवर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार चालू आहेत.

सावळे-पिळर्ण येथील एथॉन ब्रायन व्हियेगश आपल्या अन्य तीन मित्रांसमवेत सिकेरी येथील मित्राच्या वाढदिन सोहळ्याला रायबंदर येथील लियोनी परैरा, म्हापसा येथील झाहीद शेख व लीएन रोचा या मित्रांसमवेत शनिवारी रात्री गेले होते. मध्यरात्री पार्टी आटोपून घरी परतत असताना भरवेगात असलेल्या कारचालक एथॉनचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याने गाडीची जोरदार धडक रस्त्याच्या बाजूकडील जुन्या कुंपणाला बसली. या धडकेने नव्याकोर्‍या गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा होऊन कारमधील चौघेही गाडीत गंभीर अवस्थेत अडकून पडले. परिसरातील लोक साखर झोपेत असताना हा अपघात घडला. हणजुण पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी म्हापसा अग्निशमन दलाच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर गाडीत अडकलेल्या चौघांनाही बाहेर काढले. १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने त्यांना म्हापशाच्या जिल्हा इस्पितळात दाखल केले असता कारचालक एथॉनचा वाटेतच मृत्यू झाला. अन्य जखमींना बांबोळीच्या गोवा वैद्यकीय इस्पितळात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या लीएन रोचा या तरूणीचा काल दुपारी उपचारादरम्यान मृत्यु झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हा अपघात घडण्याआधी हे तरूण आसगावच्या चाररस्त्यातील एका दारू दुकानात बराचवेळ होते अशी माहिती स्थानिक लोकांकडून मिळाली. अपघातावेळी चौघेही मद्यधुंद अवस्थेत होत अशी माहिती पोलिसांनी दिली. निरीक्षक राहुल परब पुढील तपास करीत आहेत.