डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अंजली माशेलकर फाऊंडेशनकडून यंत्र विकसित; आरोग्य खात्याकडून लवकरच सुविधा; मुख्यमंत्र्यांची माहिती
डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अंजली माशेलकर फाऊंडेशनने विकसित केलेल्या बहु-चाचण्यांच्या स्ट्रिप सुविधेचा शुभारंभ गोवा राज्यातून केला जाणार आहे. अंजली माशेलकर फाऊंडेशनने 100 रुपयांच्या खर्चात 10 मिनिटांत 10 चाचण्या करण्यासाठी खास बहु-चाचण्यांची स्ट्रिप विकसित केली आहे. गोवा सरकारचे आरोग्य सेवा संचालनालय गेल्या काही महिन्यांपासून या सुविधेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करीत असून, लवकरच ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केली. कला अकादमीच्या आवारात गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲँड इंडस्ट्रीज आणि वर्ल्ड पीस युनिव्हर्ससिटी यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या ‘गोमंत गौरव’ सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा गोमंत गौरव सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष प्रतिमा धोंड, डॉ. राहुल कराड, यतीन काकोडकर, डॉ. आदिती कराड, संजय आमोणकर, डॉ. वाल्टर व इतरांची उपस्थिती होती.
आरोग्य सेवा संचालनालय अंजली माशेलकर फाऊंडेशन यांनी विकसित केलेली बहु-तपासणी स्ट्रिप सुविधा लवकर उपलब्ध करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करीत आहे. या नवीन सुविधेमुळे जलद आणि कमी खर्चात निदान चाचण्या करणे शक्य होईल आणि आरोग्य सेवांची उपलब्धता सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. माशेलकर यांचा कार्याचा गौरव केला. माशेल गावात जन्मलेल्या डॉ. माशेलकर यांनी जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली. ते सदैव सकारात्मक दृष्टिकोनातून कार्यरत असतात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
डॉ. माशेलकर यांनी तयार केलेला गोव्याच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचे काम हाती घेण्यात आले आहे. विकसित गोवा 2037 या विकास आराखड्यात डॉ. माशेलकर यांनी तयार केलेल्या अहवालातील विकासात्मक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेली वर्ल्ड पीस युनिव्हसिटी येत्या शैक्षणिक वर्षापासून कामकाजाला प्रारंभ करणार आहे. राज्यात खासगी विद्यापीठाचे स्वागत केले जात आहे. गोवा राज्य हे शैक्षणिक हब म्हणून विकसित केले जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आपल्या जडणघडणीत आईचा मोठा वाटा आहे. हा गोमंत गौरव सन्मान पुरस्कार आपण आईला समर्पित करतो. सन्मान, सत्कार सोहळ्यामुळे जबाबदारी आणखी वाढत चालली आहे. अंजली माशेलकर फाऊंडेशनतर्फे परवडणाऱ्या आरोग्य सुविधांच्या निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले आहे, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.
गोवा सरकारच्या सूचनेनुसार गोवा राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक 2035 अहवाल तयार करून सादर केला होता. गोवा एक आदर्श राज्य बनविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.