राज्य सरकारने नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यापूर्वी वीजमंत्री या नात्याने आपण आणि वीज खात्याने देखील स्मार्ट मीटरचा सखोल अभ्यास केला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना फायदा होणार आहे, असे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना येथे काल केले.
राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला काही जणांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना वीज मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, राज्यातील ग्राहकांना स्मार्ट मीटरचे फायदे माहीत नाहीत. केंद्र सरकारने देशभरात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाती घेतले आहे. केंद्र सरकार आणि जेईआरसीच्या नियमांनुसार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे याविषयावर आता कोणतीही चर्चा केली जाणार नाही.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना निश्चित फायदा होणार याची आम्हाला खात्री आहे. स्मार्ट मीटरच्या वापरानंतर याविषयावर चर्चा केली जाऊ शकते, असेही ढवळीकर म्हणाले.