Home Featured सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

0

संपूर्ण देशाने साश्रू नयनांनी सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना काल अखेरचा निरोप दिला. दशकानुदशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गज गायिका आशाताईंच्या पार्थिवावर काल दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल आठ दशके रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलीन झाला. आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांनी आशाताईंच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी आशाताईंची नात जनाईच्या अश्रूंचा बांध फुटला होता.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी 12 एप्रिल रोजी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर काल सकाळी 11 वाजता आशा भोसले यांच्या लोअर परेल इथल्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुंबई पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.

सिनेसृष्टीपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी आशाताईंच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. अंत्यसंस्काराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्वाचे नेतेही उपस्थित होते. अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता रणवीर सिंग, रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, शान, अनुप जलोटा, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक राकेश रोशन, अभिनेत्री नीना गुप्ता, मंगलप्रभात लोढा आणि भय्याजी जोशी, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, राज्यपाल जिष्णू देव शर्मा, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.