Home Featured स्वरसौदामिनी

स्वरसौदामिनी

0

विशेष संपादकीय

एक सुगंधी फूल काल ईश्वरचरणी समर्पित झाले. आशा भोसले नावाची सुरांची तळपती तलवार काल कायमची म्यान झाली. कविश्रेष्ठ सुरेश भटांनी त्यांच्यासाठी लिहिले होते, ‘तलवार तुझ्या गाण्याची । बिजलीसम तळपत राहो..’ खरोखरच संगीतक्षेत्रात ही विद्युल्लता गेली आठ दशके तळपत होती. ते स्वरतेज रसिकांना दिपवीत होते. आशाताईंनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात स्वतःच्या हिंमतीवर आणि घोर तपश्चर्येच्या बळावर आपली ओळख निर्माण केली. त्यांना खरी स्पर्धा तर घरातच होती, परंतु लतादीदींच्या सावलीतून वाट काढत त्यांनी स्वतःची वेगळी वाट शोधली, पार्श्वसंगीताच्या क्षेत्रात आपलेही अढळ स्थान निर्माण केले. काळ बदलत होता, गीत – संगीतही बदलत होतेे. परंतु त्या प्रत्येक टप्प्यावर नवनवी वळणे घेत आशाताईंचे गाणेही काळाबरोबर पुढे पुढे जात राहिले. वीस भाषांतील बारा हजार गाण्यांचा विक्रम तर त्यांच्या नावावर आहेच, परंतु केवढे वैविध्य आहे त्या गाण्यांत. मागे वळून पाहताना आज अक्षरशः थक्क व्हायला होते. 1943 साली वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मास्टर विनायकांच्या ‘माझं बाळ’ साठी ‘चला चला नवबाला, गुंफू चला कुसुमाला’ म्हणत कोरसमध्ये गाणारा हा कोवळा आवाज वयाच्या नव्वदीत दुबईत लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ‘पिया तू, अब तो आ जा.. आहा आ जा..’ करताना आणि ‘हुस्न तेरा तौबा’ची हूकस्टेप करताना पाहणाऱ्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली तर काय नवल? उगाच नाही आशाताईंना ‘साडीतील मॅडोना’ म्हणत!
पार्श्वगायनाच्या क्षेत्रात इतकी वर्षे टिकून राहण्याचे रहस्य आशाताई एका वाक्यात नेमकेपणाने सांगायच्या, ‘जसा जमाना आला, तशी मी बदलत गेले, म्हणून टिकले!’ आम्हाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, ‘काही कठीण नसतं. प्रत्येक पाऊल आपण टाकतो, तेव्हा जमीन बदलत जाते, तसे आपण पाय वेगवेगळ्या प्रकारे टाकत जातो. उंच जमीन आली तर पाय वर टाकतो, सखल असेल तर पाय खाली टाकतो. तसंच आयुष्य आहे. आपण पाय टाकत गेलो, की तसेच आपण पुढे जात असतो. आणि मला वाटतं की थांबलं की पाणी गढूळ होतं. वाहतं राहिलं तर स्वच्छ होतं…!’ खरेच आहे ते! काळ बदलला, गीत – संगीत बदलले, गाण्याची शैली बदलली, वाद्यसंगीत बदलले, संगीतकार बदलले, ध्वनिमुद्रणाची तंत्रे आणि सादरीकरणाची माध्यमे बदलली, इतकेच काय, रसिकांची अभिरूचीही वेळोवेळी बदलत गेली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतापासून गझल, ठुमरी, रागदारी, मेलडी, लोकसंगीतापर्यंत; पाश्चात्य संगीतातील जाझ, रॉक, पॉपपासून डिस्को आणि हिप हॉपपर्यंत तऱ्हेतऱ्हेचे गीत – संगीत भारतीय चित्रपटविश्वाचे दार वेळोवेळी ठोठावून गेले. परंतु आलेल्या त्या प्रत्येक संधीचे आशाताईंच्या लवचिक स्वराने सोनेच केले. मधुबाला, मीनाकुमारीपासून काजोल, उर्मिलापर्यंतच्या अभिनेत्रींना आशाताईंनी स्वर दिला आहे, ह्यावरून केवळा मोठा कालपट त्यांनी पार केला आहे हे लक्षात यावे. येणाऱ्या नवनव्या पिढ्यांना ह्या स्वराने, त्याच्या त्या लवचिकतेने वेडे केले. त्यांच्या गीतांच्या चाहत्यांची मुले, नातवंडे, पणतवंडेही आशाताईंची गाणी ऐकत मोठी झाली आहेत आणि त्यांनाही त्या गाण्यांनी तितकेच वेड लावले आहे ही ह्या जादुई स्वराची खरी कमाल आहे. येणाऱ्या नव्या पिढ्यांनाही आपलेसे वाटेल असे आशाताईंचे गाणे होते म्हणूनच त्याचे गारूड सर्वकाळ, सर्व पिढ्यांना वेढून राहिलेले दिसते. रोमान्सपासून विरहगीतांपर्यंत, तवायफांच्या जलशांपासून हॉटेलमधील कॅबरेंपर्यंत, भावगीतांपासून गझल, ठुमऱ्या आणि लोकसंगीतापर्यंत आशा भोसले आणि त्यांचा दैवी स्वर सर्वत्र असा भरून राहिलेला आहे. ‘उमराव जान’ मधल्या ‘इन आँखो की मस्ती’ किंवा ‘दिल चीज क्या है’ पासून ‘दिलवाले दुल्हनिया..’ मधील ‘जरा सा झूम लूँ मै’ पर्यंत किंवा ‘यादों की बारात’ मधल्या ‘चुरा लिया है’ पासून ‘लगान’ मधल्या ‘राधा कैसे न जले’ पर्यंतचा हा सुरांचा अविरत प्रवास आहे. ज्या लाडीकपणाने त्या ‘अभी ना जाओ छोडकर’ गातात, तेवढ्याच उदासीत ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ चे सूर आळवतात. आजही त्यांची ‘सलोना सा सजन है और मै हूँ’ ऐकताना जीव वेडावल्यावाचून राहत नाही.
मराठीत देखील ज्या नखरेलपणाने ‘बुगडी माझी सांडली गं’, ‘या रावजी’ किंवा ‘रेशमाच्या रेघांनी’ गातात, तेवढ्याच तन्मयतेनं ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘ऋतु हिरवा’ अथवा ‘घन रानी’ आळवतात. सुरेश भटांच्या ‘केव्हा तरी पहाटे’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’ यासारख्या सुंदर भावगीतांचे तर आशाताईंनी अक्षरशः सोनेच केले आहे. ‘मला हे दत्तगुरू दिसले’ किंवा ‘उठी श्रीरामा’ गाणाऱ्या आशाताईंनीच ‘दम मारो दम’ किंवा ‘आ जा आजा..’ गायिले आहे ह्यावर विश्वास बसू नये एवढे कमालीचे स्वरवैविध्य त्यांनी वेळोवेळी दाखविले आहे. सुंदर सुंदर साड्या, केसांत माळलेले फुलांचे टवटवीत गजरे, गळ्यातली सुबक मोत्यांची माळ.. आशाताईंना जणू चिरतारुण्याचे वरदानच लाभले होते. नव्या पिढीशी त्या सहजपणे नाते जुळवायच्या. म्हणूनच जुन्या गाण्यांच्या स्वतःच्या रीमिक्सनाही त्यांनी नाक मुरडले नाही. ‘गोरीलाज्‌‍’ सारख्या ब्रिटीश व्हर्च्युअल बँडला त्यांना सामावून घ्यावेसे वाटले. गाणे गाताना त्यात त्यांनी केलेल्या गमतीजमती, व्हिब्रॅटोही श्रवणीय आहेत. सुरूवातीला न जमलेल्या ‘आह आह आजा..’ चा सराव कारमध्ये करताना त्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होतोय असे समजून हबकलेल्या त्यांच्या कारचालकाने त्यांना म्हणे ‘इस्पितळात नेऊ का’ असे विचारले होते! आशाताईंच्या आयुष्यातील दर्द त्यांच्या स्वरांतही अपरिहार्यपणे प्रकटला आहे. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी कुटुंबाचा विरोध सोसून आपल्याहून वीस वर्षांनी मोठ्या इसमाशी लग्न केले. त्या संसारात प्रचंड घरगुती हिंसाचार सोसला, तिसऱ्यावेळी गरोदर असताना शेवटी घर सोडले. आर. डी. बर्मन यांच्याशी घरोबा केल्यानंतरचे दिवसही कठीणच होते. ह्या सगळ्या सोसण्यातून त्यांच्या स्वरामध्ये आलेली आर्तता आपले काळीज पिळवटून टाकल्याविना राहत नाही. ह्या सगळ्या विपरीत परिस्थितीतून त्या वेळोवेळी हिंमतीने उभ्या राहिल्या. संकटे मात्र येतच राहिली. लाडक्या कन्येने तर आत्महत्या केली. दैव जणू वेळोवेळी परीक्षा पाहत होते. परंतु रसिकाला आपल्या सुरांनी रिझवण्याचा धर्म त्यांनी सोडला नाही. म्हणूनच वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्या ‘आशा ॲट नाईंटी’ कॉन्सर्टमध्ये उभ्या राहू शकल्या. त्या कलाकार होत्याच, परंतु व्यवहारही त्यांनी उत्तम सांभाळला. पाककलेच्या आपल्या आवडीला अनुरूप ‘आशाज्‌‍’ रेस्तराँची साखळी त्यांनी विदेशांत उभारली. आपला आवाज एआयच्या मदतीने क्लोन करून बेकायदेशीरपणे वापरणाऱ्यांविरुद्धचा खटला अलीकडेच त्यांनी जिंकला होता. त्यांच्यात हा कणखरपणा होता, तशीच हळवी, भावूक, सश्रद्धताही होती. मंत्रोच्चार, पूजापाठात स्वारस्य होते. गोव्याविषयीचे आपले ममत्व, इथल्या श्रीमंगेशावरील श्रद्धा, त्यातून घडलेले दृष्टांत याविषयी त्यांनी आम्हाला दिलेल्या मुलाखतीत मोकळेपणाने सांगितले होते. आपल्या गाण्याच्या चिरतारुण्याचे रहस्य सांगताना त्यात त्या म्हणाल्या होत्या, ‘कुठलंही गाणं असो, ते आपलं स्वतःचं करून टाकायचं! ते जर आपण केलं तर त्या गाण्यामध्ये जीव येतो. मग आपणही त्या गाण्याबरोबर तरूण होत जातो..’ जागतिक कीर्तीच्या एवढ्या मातब्बर गायिका असूनही त्यांचे वागणे आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणेच अत्यंत साधे, विनम्र, विनयशील होते हे आजच्या एका रात्रीत स्टार बनणाऱ्या, परंतु दुसऱ्या रात्री विसरल्या जाणाऱ्या कलाकारांनी लक्षात घेण्यासारखे आहे. आपण खरोखर भाग्यवान आहोत की आपल्याला आयुष्यात लता मंगेशकर, आशा भोसले यासारखे दैवी सूर ऐकता आले. आता आशाताई आपल्यात नाहीत. आज अनंताच्या यात्रेलाही निघून जातील. पण या स्वरसौदामिनीचा स्वर सदैव आसमंतात कुठे ना कुठे नक्कीच लखलखत राहील…