मडगाव-कारवार मार्गावरील दापट माशे येथे काल काल सकाळी कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात देळे-काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन श्री चेतन मंजू देसाई महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाला. सुचिता बांदेकर (27) असे मृत प्राध्यापिकेचे नाव असून, त्या तासिका तत्त्वावर सदर महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करत होत्या. बेदरकारपणे वाहन हाकल्याचा ठपका ठेवून कारचालक चंद्रकांत पुतू पेडणकेर याला काणकोण पोलिसांनी अटक केली.
सविस्तर माहितीनुसार, चंद्रकांत पेडणेकर हे अमेरिका येथून परतलेल्या आपल्या कुटुंबाला वास्को विमानळावरून घेऊन कार (केए-30-एम-8197) ने कारवारला निघाले होते. तर सुचिता बांदेकर ह्या शेळी लोलये येथून काणकोणच्या दिशेने दुचाकीवरून जात होत्या. दापट माशे येथे दोन्ही वाहने पोहोचली असता कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यात सुचिता बांदेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताााी खबर मिळताच काणकोण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
या अपघाताची माहिती मिळताच श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपा च्यारी, अन्य प्राध्यापक, प्रशासकीय विभागाचे प्रमुख रामदास सावंत, अन्य कर्मचारी, विद्यार्थी, पैंगीण जिल्हा पंचायत सदस्य अजय लोलयेकर, माजी सरपंच सचिन नाईक, पैंगीणचे पंच महेश नाईक, माजी नगरसेवक हेमंत गावकर, सेंतु प्रामोतर द इन्स्त्रुसांव शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शांबा देसाई, अन्य पदाधिकारी, ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे पदाधिकारी, सुचिता बांदेकर यांचे नातेवाईक यांनी काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. यानंतर बांदेकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगावला पाठवण्यात आला. शवचिकित्सेनंतर संध्याकाळी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्यानतंर माड्डीतळप-माशे येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ व बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराम गावस पुढील तपास करीत आहेत.
सुचिता बांदेकर ह्या तीन वर्षांपूर्वी तासिका पद्धतीवर कोकणी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयात रुजू झाल्या होत्या. तसेच त्या उत्कृष्ट निवेदिका आणि नाट्यकलाकार होत्या. आतापर्यंत कित्येक नाटकांतून त्यांनी भूमिका केलेल्या असून, नुकती त्या नीट परीक्षा देखील उत्तीर्ण झाल्या होत्या.