Home Featured फोंड्यात कोण?

फोंड्यात कोण?

0

गोवा विधानसभेच्या फोंडा मतदारसंघासाठीची पोटनिवडणूक आता तोंडावर आली आहे. येत्या गुरूवारी नऊ रोजी तेथे मतदान होणार आहे. भाजपाचे आमदार व मंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या ह्या जागेवर त्यांचे पुत्र रितेश त्यांचा वारसा चालवण्यासाठी ही निवडणूक लढवीत आहेत. गेल्या वेळी रवी नाईक यांना मात देता देता केवळ 77 मते कमी पडल्याने निवडणूक हरलेले केतन भाटीकर यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर रवींच्या पुत्राला शह देण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. आम आदमी पक्षाने नेहमीप्रमाणे ‘एकला चलो रे’ चा मार्ग अवलंबत आपलाही उमेदवार उभा करून ह्या लढतीला तिरंगी स्वरूप आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. सत्ताधारी भाजपसाठी ही निवडणूक अर्थातच अतिशय प्रतिष्ठेची आहे. खरे तर रवी नाईक यांचे फोंड्यातील नेतृत्व हे स्वयंभू होते. मगो काय, काँग्रेस काय किंवा भाजपा काय, रवी नाईक यांना कधी कोणत्या पक्षाची गरज नव्हती. त्यांचा स्वतःचा मतदारवर्ग फोंड्यात होता. शिवाय भंडारी समाजाची ताकद त्यांच्या पाठीशी उभी असे. तेवढाच त्यांचा व्यापक जनसंपर्कही होता. मात्र, त्यांच्या दोन्ही पुत्रांपाशी पित्याचा राजकीय वारसा चालवण्याएवढी क्षमता आहे का ह्याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. रितेश हे ह्या पोटनिवडणुकीला उभे असल्याने रवींच्या मागे त्यांचा राजकीय वारसा चालवण्याची त्यांच्याकडे चालून आलेल्या ह्या संधीचा ते लाभ उठवू शकणार की नाही ह्याबाबत तमाम जनतेत निश्चितच उत्सुकता आहे. रवींच्या आकस्मिक मृत्यूने त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झालेली होती, परंतु प्रत्यक्ष मतदानापर्यंत ती टिकेल का हे पाहावे लागेल. केतन भाटीकर हे गेल्या निवडणुकीत अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते. परंतु त्यांनी तरीही आपल्या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे सातत्यपूर्ण संपर्क ठेवला आहे, तसा रितेश यांना ठेवता आला आहे का असा प्रश्न त्यांचे विरोधक विचारत आहेत. केतन भाटीकर यांनी गेल्या काही वर्षांत फोंडा मतदारसंघामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आपल्या मतदारांशी नित्य संपर्क ठेवून त्यांनी जो स्वतःविषयी विश्वास त्यांच्यात निर्माण केला आहे, तो सार्थकी लावीत त्यांचे मतदार पक्ष – बिक्ष विसरून त्यांच्या पाठीशी येत्या निवडणुकीत उभे राहतील का हे पाहावे लागणार आहे, कारण भाटीकर ह्यावेळी काँग्रेसतर्फे उभे आहेत. मगो – भाजप युतीमुळे त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाहीशी झाल्यामुळे त्यांना पक्षांतर करण्यावाचून पर्याय उरला नव्हता. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील ही राजकीय अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. तिसरे उमेदवार गीतेश नाईक हे निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षात प्रवेशले आणि त्यांना उमेदवार म्हणून पक्षाने निवडणुकीत उतरवले. मात्र, ही लढत तिरंगी करण्याइतपत मतदारांचा पाठिंबा ते मिळवू शकतील का, तेवढा विश्वास त्यांनी त्यांच्या मतदारांमध्ये अल्पावधीत निर्माण केला आहे का, हे पाहावे लागेल. गोवा फॉरवर्डने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा द्यावा असे जाहीर आवाहन काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार व्हिरियातो फर्नांडिस यांनी केले आहे. खरे म्हणजे भाजपच्या उमेदवाराला आव्हान देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढविण्यासाठीची बोलणी ह्या पोटनिवडणुकीची अर्जप्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच व्हायला हवी होती. परंतु ‘इंडिया’ आघाडी म्हणायचे आणि स्वतंत्रपणे परस्परांविरुद्ध लढायचे हाच प्रकार सर्वत्र चालला आहे. आम आदमी पक्षाचा प्रत्येक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यामागचा हेतू नेमका काय हा प्रश्न त्यामुळे जनतेला पडत आलेला आहे. फोंड्याची पोटनिवडणूकही त्याला अपवाद नाही. आम आदमी पक्षाला नेमकी कोणाची मते फोडायची असतात आणि का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो. तिन्ही पक्षांमध्ये फोंड्याच्या मतदारांना जवळ खेचण्याची अहमहमिका लागलेली दिसते. झोपडपट्ट्यांतील मतदारांपासून विशिष्ट समाजाच्या मतदारांपर्यंत एकगठ्ठा मते मिळवण्याची धडपड सर्वांनीच चालवली आहे. एस. आय. आर. नंतर मागील निवडणुकीपेक्षा जवळजवळ चार हजार मतदार ह्यावेळी कमी झाले आहेत. त्यामुळे आधीच नाजूक असलेले बलाबल ह्यावेळी कसे फिरते हे पाहावे लागेल. गोवा विधानसभा निवडणुकीला काही महिने उरले आहेत. त्यामुळे फोंडा मतदारसंघाची विधानसभा पोटनिवडणूक ही त्याच्यासाठीची जणू रंगीत तालीम आहे. ह्या निवडणुकीचा निकाल हा मूलतः स्थानिक विषयांवर, स्थानिक परिस्थितीवर आधारित असणार आहे, त्यामुळे एकूण विधानसभा निवडणुकीचा रागरंग त्यातून स्पष्ट होण्याची शक्यता नाही. परंतु जो विजयी होईल त्या पक्षाचे मनोबल मात्र ह्या विजयातून वाढणार असल्याने त्याबाबत मतदारांमध्ये कुतूहल आहे.