भाजपविरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांची एकजूट हवी
गोवा विधानसभा 2027 च्या निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकतेची गरज आहे. काँग्रेस पक्ष गोव्यातील समविचारी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना काल केले.
गोव्यातील विरोधी पक्ष एकसंध नसल्याने भाजपला फायदा होत आहे. गोव्यात विरोधी पक्षांची संयुक्त आघाडी तयार करण्यासाठी रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी), गोवा फॉरवर्ड पार्टी (जीएफपी) आणि इतर प्रादेशिक पक्षांसोबत चर्चा करण्यास काँग्रेस तयार आहे; पण सहा ते सात महिने आधीच आघाडी निश्चित करणे राजकीयदृष्ट्या व्यवहार्य नाही. निवडणूक जवळ आल्यावर उत्तम समन्वय साधता यावा यासाठी प्राथमिक चर्चा आणि पूर्वतयारीसाठी लवकर संयुक्त बैठक घेण्याची गरज आहे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
गोव्यातील विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी तडजोड करण्याची तयारी सर्व समविचारी पक्षांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस पक्षाची सुध्दा तडजोड करण्याची तयारी आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी काँग्रेसची आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.
गोवा फॉरवर्ड हा पक्ष मागील निवडणुकीत काँग्रेस सोबत होता. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेससोबत राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.