आम आदमी पक्षाचे आक्रमक नेते आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा हे देशपातळीवर चर्चेत आहेत. आपने त्यांना राज्यसभेतील ‘उपनेते’ पदावरून हटवून अशोक कुमार मित्तल यांच्याकडे ही धुरा सोपवली आहे. उपनेते पदावरून हटवल्यानंतर राघव चढ्ढा यांनी काल पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली. तसेच आपच्या नेत्यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रियेवर तिखट शब्दांत हल्ला चढवला.
राघव चढ्ढा यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहेे. ‘माझ्या शांततेचा अर्थ माझा पराभव समजू नका. मला गप्प करण्यात आले आहे, पण मी हरलेलो नाही. मला जेव्हा जेव्हा संसदेत बोलण्याची संधी मिळते, तेव्हा मी जनतेचे मुद्दे मांडतो. जनतेचे मुद्दे मांडणे हा गुन्हा आहे का? मी काही पाप केले आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दुसऱ्या बाजूला आपचे नेते तथा माजी आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी काल एक व्हिडिओ पोस्ट करत खासदार राघव चढ्ढा यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. संपूर्ण देशात खऱ्या मतदारांची नावे कापली जात असून बोगस मतांच्या जोरावर यंत्रणेवर ताबा मिळवून निवडणुका जिंकल्या जात आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी प्रयत्न केला, पण तुम्ही त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. संसदेत जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष सभात्याग करतात, तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत नसता. पंतप्रधान किंवा भाजप सरकारला प्रश्न विचारेल असा एकही मुद्दा तुम्ही सभागृहात मांडलेला नाही. अशी भीतीचे राजकारण कसे चालणार? असा सवाल भारद्वाज यांनी केला.