Home Featured युद्ध नव्या वळणावर

युद्ध नव्या वळणावर

0

इराण – अमेरिका युद्ध आज एका निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. हे वळण अत्यंत महत्त्वाचे आहे. येथून जाणारा एक मार्ग हे युद्ध प्रलंबित करणारा आणि समूळ विद्ध्वंसाकडे घेऊन जाणारा आहे, तर दुसरा मार्ग तडजोडीचा आणि काही अटींवर समेटाचा आहे. हा दुसरा समेटाचा मार्ग दृष्टिपथात असल्याचा आणि युद्ध अमेरिकेने जिंकल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करीत आहेत. ह्यापैकी समेट घडत असेल तर ती चांगलीच बाब आहे, परंतु अमेरिकेने हे युद्ध जिंकले हे मानणे मात्र तरीही जड जाते. खरे तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धखोरीमुळे अमेरिका आज अशा चक्रव्यूहात सापडलेला आहे की हे युद्ध पुढे नेणेही शक्य नाही आणि मुकाट माघार घेणेही शक्य नाही. त्यामुळे काहीही करून तडजोड करून हे युद्ध निकाली काढण्याची धडपड ट्रम्प यांनी चालवली आहे. आणि अर्थात, हे करीत असताना ‘पडलो तरी नाक वर’ म्हणतात त्याप्रमाणे ट्रम्प युद्ध जिंकल्याचा हास्यास्पद दावा करीत आहेत. अमेरिकेने इराणपुढे पंधरा अटी ठेवल्या होत्या, परंतु त्या इराणच्या नेतृत्वाने फेटाळून लावत आपल्या पाच अटी पुढे केल्या आहेत. ट्रम्प यांनी हे युद्ध इराणवर लादताना इराणमध्ये सत्तांतर घडविण्याची प्रतिज्ञा केली होती. खरे तर ट्रम्प यांना तेव्हा इराणची जनता हे सत्तांतर घडवील अशी अपेक्षा होती. परंतु येथे इस्रायलच्या मदतीने इराणच्या एकेका नेत्याचा खात्मा करीत अजब प्रकारे हा ‘सत्ताबदल’ केला गेलेला दिसतो. खामेनेई यांची युद्धाच्या पहिल्याच दिवशी इस्रायलने हत्या केली, त्यानंतर सर्वोच्च नेते म्हणून ज्या मोज्तबा खामेनेई यांची निवड केली गेली, ते अद्याप हयात आहेत. त्यामुळे तोवर अमेरिकेने कोणाशीही जरी वाटाघाटी केल्या, तरी त्यांना अधिकृतता प्राप्त होत नाही. त्यामुळे मोज्तबा यांचा काटा काढण्याचा आता आटोकाट प्रयत्न होईल. हे युद्ध जिंकल्याचा आभास निर्माण करण्यासाठी ट्रम्प इराणचे समृद्ध युरेनियम ताब्यात घेऊन ते आंतरराष्ट्रीय आण्विक संघटनेच्या हवाली करण्याचे टोकाचे पाऊल उचलू शकतात व त्यासाठी धाडसी सैनिकी कारवाई करू शकतात. म्हणजे इराणची अण्वस्त्रक्षमता नष्ट करण्याचे अमेरिकेचे उद्दिष्ट साध्य केल्याची शेखी त्यांना मिरवता येऊ शकेल. दुसरी शेखी ते मिरवतील ती होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणचे वर्चस्व नष्ट केल्याचे. ट्रम्प यांनी ज्यांच्याशी वाटाघाटी चालवल्या आहेत, ते जर त्याला तयार झाले, तर होर्मुझमधून मुक्त तेलवाहतूक पुन्हा सुरू केल्याचे श्रेय ट्रम्प यांना उपटता येईल. त्यासाठी त्यांची सारी धडपड आहे. इराणनने जी ‘भेट’ दिल्याचा उल्लेख ट्रम्प करीत आहेत, ते दुसरे काही नसून, दहा तेलवाहू जहाजांना होर्मुझमधून जाण्याची मिळालेली परवानगी हेच आहे. मात्र, खरोखरीच अमेरिकेच्या जहाजांना अशी परवानगी इराणनने दिली का हे अद्यापही स्पष्ट नाही. बहुधा पाकिस्तानसारख्या मित्रदेशांना इराणने दिलेल्या परवानगीचे श्रेयच ट्रम्प उपटू पाहात आहेत असे दिसते. तिसरे उद्दिष्ट अमेरिका साध्य करू पाहते ते म्हणजे यापुढे हिज्बुल्ला, हौथी वगैरे बंडखोर गटांना इराण समर्थन देणार नाही अशी ग्वाही ते जगाला मिळवून देऊ इच्छितात. इराण – अमेरिका इस्रायल युद्धात इस्रायलला ह्या बंडखोर गटांचा मोठा उपद्रव झालेला पाहायला मिळाला. इराणपेक्षाही लेबनॉनमधून हिज्बुल्लांनी इस्रायलची शहरे लक्ष्य केली. त्यामुळे शेवटी इस्रायलला लेबनॉनवर हल्ले चढवणे भाग पडले. हिज्बुल्ला हे इस्रायलचे प्रमुख लक्ष्य बनले. हमासच्या नायनाटानंतर हिज्बुल्ला आणि हौथींना नष्ट करून इस्रायल स्वतःची सुरक्षा सुनिश्चित करू पाहतो आहे. त्यामुळे इराणकडून हे आश्वासन जर अमेरिका घेणार असेल तर ते जगाच्याही हिताचेच ठरेल. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना पदच्युत केल्यावर ज्याप्रकारे तेथील तेलउत्पादनावर ताबा मिळवून अमेरिकेने तेथील नैसर्गिक संसाधनांची राजरोस लूट केली, त्याप्रमाणेच इराणच्या खर्ग बेटावर ताबा मिळवून त्याची सारी तेलउत्पादन क्षमता आपल्या ताब्यात घेण्याचाही अमेरिकेचा मानस आहे. मात्र, इराणमध्ये ज्यांच्याशी वाटाघाटी चालल्या आहेत, ते ह्याला कबूल होतील का हा मोठा प्रश्न आहे. मुळात ह्या ज्या तथाकथित वाटाघाटी चालल्या आहेत, त्यांना वैधता आहे का आणि इराणचे लष्करी नेतृत्व अजूनही ज्यांच्यापाशी आहे, त्यांचे त्यांना समर्थन आहे का ह्याबाबत अद्याप साशंकता आहे. ही स्पष्टता जेव्हा येईल तेव्हाच हे युद्ध कोणते वळण घेईल हे स्पष्ट होईल. तडजोड होणार की युद्ध लांबणार हा या घडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूगत ट्रम्प यांची सध्या अवस्था झाली आहे. ते आत तर शिरले, परंतु बाहेर कसे यायचे हे त्यांना कळेनासे झाले आहे. त्यामुळे झाली तर सत्ताबदल, युरेनियम जप्ती, होर्मुझमुक्ती आणि हिज्बुल्ला – हौथींना तिलांजली ह्या मुद्द्यांवर तडजोड शक्य आहे.