- मीना समुद्र
आज 8 मार्च 2026. जागतिक महिला दिन. स्त्री-मुक्ती, स्त्री-शक्ती याविषयी भाषणे दिली जातात. तिचे गुणगान होते. स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची ताल आणि तोल सांभाळणारी दोन चाके असली तरी व्यक्तिगतरीत्या आणि सार्वजनिकरीत्याही तिला समान वागणूक दिली जाते का?
आज 8 मार्च 2026. जागतिक महिला दिन. मार्च महिना आला की महिला दिनाचे वारे वाहू लागतात. सर्वत्र महिलांचा महिमा गायिला जातो. स्त्री-मुक्ती, स्त्री-शक्ती याविषयी भाषणे दिली जातात. तिचे गुणगान होते. आपापल्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या, कर्तृत्व गाजविणाऱ्या स्त्रियांची भाषणे होतात. सर्वसामान्य स्त्रियांना त्यातून प्रेरणा मिळते, मार्गदर्शन होते. समाजाचे महत्त्वाचे अंग असणाऱ्या स्त्रियांना समाजाकडून मिळणारी वागणूकही कळते.
स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची ताल आणि तोल सांभाळणारी दोन चाके असली तरी व्यक्तिगतरीत्या आणि सार्वजनिकरीत्याही त्यांना समान वागणूक दिली जात नाही. अशाच विषम परिस्थितीविरुद्ध संघर्षासाठी उभ्या ठाकलेल्या स्त्रियांच्या समुदायाने एकत्र होऊन आवाज उठवला तो 8 मार्च 1908 रोजी. कापड व्यवसायातल्या स्त्रिया त्यांच्या रास्त मागण्यांसाठी रस्त्यावर आल्या. त्यांच्या कामाचे तास कमी असावेत, त्यांना सुरक्षितता मिळावी आणि पुरुषांच्या तुलनेत काम जास्त करूनही कमी असणाऱ्या पगारात वाढ व्हावी अशा त्या मागण्या होत्या.
फ्रेंच राज्यक्रांतीनंतर 1917 साली महिला दिन साजरा केला गेला. तत्पूर्वी 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटगी या महिलेने 8 मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि तो पास करून घेतला. 1917 नंतर 8 मार्च हा महिला दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. मोठ्या गाजावाजाने आणि उत्साहाने तो पार पडतो. 1975 हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून साजरे झाले.
महिला दिना दिवशी किंवा त्या विशिष्ट वर्षी महिला दिनाचे गोडवे गायचे, तिचा उदो-उदो करायचा आणि बाकी वेळी तिला कस्पटासमान लेखायचे. पुरुषप्रधान संस्कृतीत तर तिला पायपुसण्याचीही किंमत द्यायची नाही. तिच्यावर बलात्कार, अत्याचार करून मान वर करून समाजात वावरायचे, हे कितपत योग्य? कित्येक महिला अशा पुरुषी अहंकाराच्या बळी ठरलेल्या आहेत. पण मनाने आणि शरीराने कोमल असणारी स्त्री ही अतिशय बलशाली असते. ज्यांनी आपले अंतःसामर्थ्य ओळखले त्या स्त्रिया जगाच्या नकाशावर आपले नाव कोरून गेल्या आणि सर्व जगाला ललामभूत झाल्या, इतिहासात अजरामर झाल्या. केवळ ज्यांच्या स्मरणाने मनात दिव्य आभा जागते आणि अंतःप्रेरणा प्रवाहित होते, चैतन्य अंगी संचारते अशा या स्त्रिया वंदनीय ठरतात. त्यांनी आकांक्षापुुढती गगन ठेंगणे मानले. नवी क्षितिजे पार केली.
भारतीय समाजापुरते पाहायचे झाल्यास एकीकडे स्त्रीला अत्यंत पूज्य स्थान दिले गेले होते. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ असा सूर आळवला गेला. तिला देवी-देवतेचा सन्मान दिला आणि दुसरीकडे तिच्या विकासाचे सर्व मार्ग खुंटवून तिला पायदळी तुडविले. तिला ना शिकण्याचा अधिकार, ना समाजात वावरण्याचा. ‘चूल आणि मूल’ एवढेच तिचे जग. तिच्यापुढे पोथ्यापुराणातले गार्गी-मैत्रेयीसारख्या विदुषींचे आदर्श होते. अहिल्या- द्रौपदी- सीता- तारा- मंदोदरी अशा स्त्रियांचे, सावित्रीच्या पतिनिष्ठतेचे आदर्श होते. सतीप्रथा, विधवांचे केशवपन, बालविवाह, जरठविवाह अशांची बजबजपुरी माजलेली असताना या समाजधारणेविरुद्ध अण्णासाहेब कर्वे, टिळक-आगरकर, म. गांधी, ज्योतिबा फुले अशा समाजसुधारकांनी आवाज उठवला. स्त्री-शिक्षणासाठी ते झटले आणि सावित्रीबाई फुले यांनी तर शेणगोळे आणि चिखलफेक सहन करून शिक्षणाचा प्रकाश मुलीबाळींच्या आयुष्यात आणला. शिक्षणामुळे स्वतःच्या स्थितीचे भान महिलांना आले आणि यंत्रयुग आणि औद्योगिकीकरणामुळे बदललेल्या आर्थिक रचनेत स्त्रियांनी घराबाहेर पडून योगदान दिले. अर्थार्जनाला सुरुवात केल्यानंतर थोडेफार स्वातंत्र्य तिला मिळाले. उंबरठ्याआत होणारी घुस्मट थांबवून थोडा तरी मोकळा श्वास घेता आला. तरीही गृहिणी ही ‘शिजणारी मीच आणि शिजवणारी मीच’ अशी ठरली. बाहेरून काम करून आली तरी घरातल्या तिच्या जबाबदाऱ्या आणि त्या पूर्ण करण्याच्या अवास्तव अपेक्षा वाढत्याच राहिल्या. स्त्री ही जात्याच सहनशील आणि सर्वांना जोडू पाहणारी. त्यामुळे तिची ओढाताण संपली नाही. ती वरचढ ठरते आहे हे पाहून पुरुषी अहंकाराने फणा काढला. कधी ती पैसा देणारे यंत्र झाली, कधी हुंडाबळी ठरली, कधी अपमानीत झाली, जीव नकोसा होऊन तिने विहिरी जवळ केल्या, गळफासही घेतले आणि नैराश्यग्रस्ततेने जीवन संपविले. ग्रामीण भागात अशिक्षित सासू-सुना, नणंदा-भावजया यांची नाती ही तेढ निर्माण करणारी ठरली. तर नवऱ्याविरुद्ध ‘ब्र’ काढला तर तिला हाणामारी करण्यासही मागेपुढे पाहिले गेले नाही. व्यसनाधीन पतीची सेवा, सासरची माहेराकडून पैसे-वस्तूंची मागणी, माहेरची गरिबी आणि मागणीचा भस्मासुर, कधी फसवणूक यात होरपळून गेली. तर असह्य होऊन तिने कधी आवाजही उठवला.
पद्मा गोळेंसारखी समर्थ कवयित्री बजावते-
नाही हो मी नुसती नार, पेजेसाठी जी लाचार!
शेजेसाठी आसुसणार, नाही मी नुसती मादी
मी माणूस, माणूस आधी!
घरादारासाठी सर्वस्व देत असताना स्त्री ही आपल्याला माणूस म्हणून वागवावे, थोडे समजून घ्यावे अशी तिची अपेक्षा असल्यास ती योग्यच आहे. आजकाल घरातही पतीचे सहकार्य मिळते ही जमेची बाजू.
स्त्रीजवळ सर्जनाचे सामर्थ्य आहे. याच्या आधाराने आणि त्याच्या जोरावर ती सारे सहन करते. विं. दा. करंदीकरांसारख्या एखाद्या कविवर्याला तिच्या कष्टाची जाणीव असते-
“तू घरभर भिरभिरत असतेस; लहानमोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात; स्वागतासाठी सुहासिनी असतेस; वाढताना यक्षिणी असतेस; भरवताना ‘पक्षिणी’ असतेस; साठविताना ‘संहिता’ असतेस; भविष्याकरिता स्वप्नसती असतेस.
संसाराच्या दहाफुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही” अशा शब्दांत ते गृहिणीला गौरवतात.
‘सुकन्या समृद्धी’, ‘जननी सुरक्षा’, ‘प्रधानमंत्री मातृत्ववंदना’, ‘उज्ज्वला योजना’, ‘लाडली लक्ष्मी’, ‘लाडकी बहीण’सारख्या योजना सरकार राबवते. महिलांसाठी गावाशहरांतून स्वतंत्र शौचालये, तिच्या संरक्षणाची जबाबदारी, मुलांसाठी संस्कृती जपणारी संस्कार विद्यालये, स्त्रीचे शिक्षण, समान संधी उपलब्ध करून देणे अशा स्त्रीच्या काही गरजा पूर्ण करणाऱ्या यंत्रणा जागोजागी असणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजरथाचे चाक जमिनीत रूतणार नाही. त्याला सतत गती मिळत राहील. हाती पाळण्याची दोरी असणारी स्त्री घरादाराचा, जगाचा उद्धार करणारी वत्सल, ममतामयी, करुणामयी क्षमाशील धरणीप्रमाणे असते. ती तोडणारी नसून जोडणारी, जपणारी असते. कवी अशोक बागवे यांनी म्हणून तर मही (पृथ्वी) + इला (सरस्वती)चे रूप ‘महिला’ शब्दात पाहिले असेल ना! अशा सर्व महिलांना वंदन, विनम्र अभिवादन!!