बिहारच्या राजकीय पटलावर मोठी घडामोड येत्या दोन दिवसांत घडण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून समोर आली आहे. नितीश कुमार यांच्या जागी भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे बिहारचे उपमुख्यमंत्री होतील अशी माहिती समोर येत आहे.
बिहारमध्ये एनडीएच्या वाट्याला राज्यसभेच्या आठ जागा येणार असून त्यापैकी दोन जागा या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलला मिळण्याची शक्यता आहे. त्या दोन जागांपैकी एका जागेवर नितीश कुमार राज्यसभेवर जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून, केवळ नितीश यांची सही बाकी आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. नितीश कुमार हे 5 मार्च रोजी राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
‘जेडीयू’मध्ये हालचालींना वेग
नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठीची चर्चा जवळपास पूर्ण झाल्याची माहिती जनता दल (युनायटेड) पक्षाशी निगडीत सूत्रांनी दिली. राज्यसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि नितीश कुमार यांच्यात जवळपास तीन तास चर्चा झाली. प्रदीर्घ चाललेल्या या बैठकीत राज्यसभा निवडणूक आणि इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते.