अमेरिका आणि इस्त्रायलच्या इराणविरोधातील युद्धाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काल या युद्धाचा तिसरा दिवस होता. दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र आणि द्रोन हल्ले चालूच असल्याने तिसऱ्या दिवशी देखील मोठी हानी झाली. या युद्धात इराणमधील 555 नागरिकांचा बळी गेला आहे. इराण समर्थित संघटना हिझबुल्लाहने काल लेबनॉनमधून इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि द्रोन हल्ले केले. हे हल्ले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर बदला म्हणून करण्यात आल्याचे सांगितले गेले. यानंतर इस्रायलने देखील तात्काळ प्रत्युत्तर देत लेबनॉनमधील बेरूतच्या दक्षिण भागावर हवाई हल्ले केले. त्यात वरिष्ठ हिझबुल्ला नेत्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यात 31 जण ठार झाले, तर 149 जखमी झाल्याची माहिती आहे.
इस्रायलच्या पंतप्रधान
कार्यालयावर हल्ल्याचा दावा
इस्रायलची राजधानी तेल अवीवमधील पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा दावा इराणने काल केला. तसेच, हैफा व पूर्व जेरुसलेममधील सुरक्षा स्थळांसह इस्रायली सरकारी व लष्करी कार्यालयांवर हल्ला केला असल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने केला. हल्ल्यानंतर नेतान्याहू यांची प्रकृती खालावली असल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र, इस्रालयने पंतप्रधानांच्या कार्यालयावर हल्ला झाल्याचा दावा फेटाळला आहे.
इराणचे वरिष्ठ अधिकारी लक्ष्य
इस्रायलने पुन्हा एकदा इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. इस्रायलने थेट गुप्तचर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांवरच हल्ले केले आहेत. या हल्ल्यात अनेक वरिष्ठ अधिकारी मारले गेल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायल लष्करी दलाने एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, या हल्ल्यात सय्यद याह्या हमीदी मारले गेले. तसेच हेरगिरी विभागाचे प्रमुख जलाल पूर हुसेन हेही या हल्ल्यात ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली.
खामेनेई यांच्या पत्नीचाही मृत्यू
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या पत्नी मन्सुरेह खोजस्ते बागेरजादेह यांचाही अमेरिका-इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इराणचे अधिकृत प्रसारक ‘प्रेस टीव्ही’ने सोमवारी याबाबत माहिती दिली. इराणी सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, खोजस्ते याच हल्ल्यांच्या मालिकेत जखमी झाल्या होत्या आणि नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
चार अमेरिकन सैनिक ठार
इराणने आखाती देशांतील अमेरिकेच्या काही लष्करी तळांवर हल्ले करून मोठे नुकसान केल्याचा दावा केला आहे. काल अमेरिकेने जाहीर केले की, इराणी हल्ल्यांमध्ये त्यांच्या सैन्य दलातील चार सैनिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात तीन सैनिकांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या एका सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
इराणकडून क्षेपणास्त्रांचा मारा
दुसरीकडे, इस्त्रायलने दिलेल्या माहितीनुसार इराणकडून सतत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा होत असून देशभरात हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यासाठी सायरन वाजत आहेत. इराणचे हल्ले सुरू असतानाच शेजारी देश लेबनॉनमधूनही इस्त्रायलवर हल्ले करण्यात आले. त्याला प्रत्युत्तर देताना इस्त्रायलने बेरूतमध्ये कारवाई करत हिझबुल्लाहच्या गुप्तचर मुख्यालयाचे प्रमुख हुसेन मकलेड यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे.
कुवेतने पाडली अमेरिकेची तीन विमाने
इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. अमेरिकेची तीन ‘एफ-15 ई’ प्रकारची लढाऊ विमाने कुवेतच्या हवाई संरक्षण दलाकडून चुकून पाडली गेली. ही घटना ‘मैत्रीपूर्ण चुकून झालेला गोळीबार’ असल्याचे अमेरिकन लष्कराने सोमवारी स्पष्ट केले. इराणमधील लष्करी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी ही विमाने उड्डाण करत होती. यापूर्वी समाजमाध्यमांवर काही चित्रफिती प्रसारित झाल्या होत्या, ज्यामध्ये अमेरिकेची विमाने आगीच्या ज्वाळांत जमिनीवर कोसळताना दिसत होती.